ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली १२०० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 01:03 PM2020-07-02T13:03:59+5:302020-07-02T13:04:46+5:30

१७ जणांचा मृत्यू, तर ८३० जणांवर उपचार सुरू

The number of corona victims in rural areas has reached 1200 | ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली १२०० वर

ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली १२०० वर

googlenewsNext
ठळक मुद्देदिवसभरात ८३ रुग्णांची भर बजाजनगर येथे ३९ रुग्णांची भर

औरंगाबाद : शहरामध्ये वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत बरोबरीने ग्रामीण भागातील बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी दिवसभरात नव्याने ८३ रुग्णांची भर पडल्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या १२०० वर पोहोचली, तर १७ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, ८३० जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी दिली. 

जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वेगाने प्रसार मागील १५ दिवसांपासून होत आहे. यात बजाजनगर, पंढरपूर, वाळूज या औद्योगिक  वसाहतीमधील बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्याच वेळी वैजापूर, गंगापूर, कन्नड, पैठण आदी तालुक्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. बुधवारी ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा आकडा बाराशेवर पोहोचला. सायंकाळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार दिवसभरात औरंगाबाद तालुका ४२, गंगापूर ११, कन्नड ५, वैजापूर १८, फुलंब्री १, खुलताबाद ५,  सिल्लोड १   आणि पैठण तालुक्यात २ कोरोनाबाधितांची वाढ झाली. एकूण ८३ रुग्णांमुळे ग्रामीण भागातील आकडा १२०० वर पोहोचला. आता  ग्रामीण भागात एकूण ८३० रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तर ३५३ रुग्णांना कोरोनामुक्तीनंतर घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असल्याचेही डॉ. गंडाळ यांनी  स्पष्ट केले.

बजाजनगर येथे ३९ रुग्णांची भर
बजाजनगर परिसरात बुधवारी ३९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळून आले. तरीही मागील काही दिवसांतील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी पाहता दोन दिवसांपासून रुग्णसंख्येत अल्पशा फरकाने का होईना; पण घट दिसून येत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बजाजनगर परिसरात महिनाभरापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी भरमसाठ वाढ चिंताजनक ठरत आहे. लॉकडाऊनदरम्यान या परिसरात बोटावर मोजण्याइतकेच कोरोनाचे रुग्ण होते. त्यानंतर मात्र वेगाने  पसरत चाललेल्या कोरोनाच्या संसर्गाने उद्योगनगरीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, ग्रामपंचायती, एमआयडीसी व सिडको प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या परिसरात मंगळवारी ३४ तर बुधवारी ३९ कोरोनाबाधित आढळून आले. बुधवारी १३५ नागरिकांचे स्वॅब घेतल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम बामणे यांनी सांगितले. 

कुंभेफळ येथील आणखी ६ पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या १० वर
कुंभेफळ येथे स्कोडा कंपनीच्या कामगारासह ३ जण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील आणखी ६ जणांचे नमुने बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कुंभेफळची एकूण रुग्णसंख्या १० वर गेली आहे. या सहामध्ये एका खाजगी डॉक्टरचा समावेश आहे. कुंभेफळ येथे १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर मंगळवारी (दि.३० जून) येथील रहिवासी व स्कोडा कंपनीतील एक कामगार व आणखी दोघे, असे एकूण ३ पुन्हा पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे त्यांच्या परिवारातील व संपर्कातील एकूण ६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता, या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आला आहे. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून जालनारोड व गावातील दुकान एक दिवसाआड बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुधीर मुळे यांनी दिली. 

Web Title: The number of corona victims in rural areas has reached 1200

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.