New water supply scheme for Aurangabad city approved | औरंगाबादसाठी १,६८० कोटींची नवी पाणीपुरवठा योजना मंजूर

औरंगाबादसाठी १,६८० कोटींची नवी पाणीपुरवठा योजना मंजूर

ठळक मुद्दे जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २,४५० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी शहरात २,१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या पुढील पंधरा वर्षांत शहराला ६०४ एमएलडी पाणी मिळेल. ही योजना दोन टप्प्यांत पूर्ण केली जाईल.

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न अवघ्या ५५ दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडविला. शहरासाठी नवीन १,६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आज मंजूर केली. या योजनेच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी करताच सायंकाळी उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी सेना-भाजप पदाधिकाऱ्यांसोबत एका भरगच्च पत्रकार परिषदेत नवीन पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अवघ्या पाचच दिवसांत निविदा प्रसिद्ध करणार आहे. तीन वर्षांमध्ये योजना पूर्ण होईल. योजनेला शंभर टक्केशासन अनुदान असल्याचेही जाहीर करण्यात आले.

समांतर जलवाहिनीचा प्रकल्प रद्द केल्यानंतर आजही सर्वोच्च न्यायालयात मनपाविरुद्ध कंपनी, असा वाद सुरू आहे. पाण्याअभावी शहरातील लाखो नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा, अशी मागणी अतुल सावे यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना वैयक्तिक लक्ष घालून ही योजना पूर्ण करावी, अशी सूचना दिली. अवघ्या ५५ दिवसांमध्ये विविध अडथळ्यांची शर्यत पार करीत फाईल सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचली. आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्वाक्षरी केल्याचे सावे यांनी नमूद केले.

२०५०-५२ पर्यंत औरंगाबादसह आसपासच्या खेड्यांची लोकसंख्या किमान ३५ ते ४० लाख होणार आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी योजनेचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेत जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २,४५० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकणे, शहरात २,१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, नक्षत्रवाडी येथे नवीन एमबीआर बनविणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आदी कामांचा समावेश आहे. ही योजना दोन टप्प्यांत पूर्ण केली जाईल. पहिला टप्पा पंधरा वर्षांचा राहील. या टप्प्यात शहराला ४५१ एमएलडी पाणी मिळेल. त्यानंतर पुढील पंधरा वर्षांत शहराला ६०४ एमएलडी पाणी मिळेल. नवीन पाणीपुरवठा योजनेत सातारा, देवळाईसह महापालिका हद्दीतील सर्व भागांचा समावेश करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत पालिका हद्दीचे क्षेत्रफळ १७६ वर्ग कि.मी. एवढे आहे. या सर्व भागात एकूण २,१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येतील. नवीन पाणीपुरवठा योजनेत सर्वाधिक खर्च ५३३ कोटी रुपये मुख्य जलवाहिनीसाठी, २७३ कोटीअंतर्गत जलवाहिन्यांसाठी आणि २५४ कोटी शुद्धीकरण केंद्र व तेथून पुढे जलकुंभापर्यंत जलवाहिन्यांसाठी लागणार आहेत.

मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी यावेळी नमूद केले की, नक्षत्रवाडीत मोठे एमीबीआर तयार करण्यात येईल. तेथून एकूण ५ जलवाहिन्या शहरात येतील. सध्या शहरात २७ जुन्या टाक्या आहेत. नवीन ५२ टाक्या तयार करण्यात येतील. पत्रकार परिषदेला उपमहापौर विजय औताडे, सभापती जयश्री कुलकर्णी, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, सभागृहनेता विकास जैन, माजी महापौर बापू घडमोडे, गजानन बारवाल, शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, नगरसेवक दिलीप थोरात, प्रमोद राठोड, मकरंद कुलकर्णी, शिवाजी दांडगे आदींची उपस्थिती होती. 

उद्धव ठाकरेंनी साकडे घातले म्हणून
१७ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीनिमित्त औरंगाबादेत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहराचा पाणी प्रश्न सोडवा म्हणून मुख्यमंत्र्यांना साकडे घातले होते. त्यांच्यामुळेच ही योजना मार्गी लागल्याचा दावा आज पत्रकार परिषदेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला.

नवीन पाणीपुरवठा योजनेचे स्वरूप
१,६८० कोटी योजनेचा संपूर्ण खर्च. 
५३३  कोटी मुख्य जलवाहिनीसाठी.

२,४५०  मि.मी.व्यासाची मुख्य जलवाहिनी.
२७३  कोटीअंतर्गत जलवाहिन्यांसाठी.

२७   टाक्या जुन्या वापरणार
२५   नवीन टाक्या बांधणार.

६६० मीटर उंचीवर नक्षत्रवाडीत नवा एमबीआर.
७००  किलोमीटरच्या नव्या अंतर्गत जलवाहिन्या.

०८ कोटी दरमहा विजेचा खर्च येणार.
२०५० इ.स. डोळ्यासमोर ठेवून योजनेचे डिझाईन.

Web Title: New water supply scheme for Aurangabad city approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.