Need to take the charge of BJP's crazy Horse : Balasaheb Ambedkar | मस्तवाल घोड्याचा लगाम हातात घेण्याची गरज : बाळासाहेब आंबेडकर 
मस्तवाल घोड्याचा लगाम हातात घेण्याची गरज : बाळासाहेब आंबेडकर 

ठळक मुद्देमुख्यमंत्री व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भाषा हुकूमशाहीची असदुद्दीन ओवेसी हा चांगला माणूस आहे, पण त्यांचे साथीदार चुकीचे राहुल गांधींना प्रेमाचा सल्ला ‘राफेलवर बोलू नको’

औरंगाबाद : या निवडणुकीत चूक झाली तर पुन्हा  संधी मिळेल, असे वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची हिंमत असेल तर करून दाखवा वगैरे ही भाषा हुकूमशाहीची आहे. ती लोकशाहीला पूरक नाही. आम्हाला अडवणार कोण, असा आभास निर्माण केला जात आहे. हुकूमशाही प्रवृत्तीला जनताच काबूत आणत असते. यांचा मस्तवाल व बेलगाम घोडा उधळलेला आहे. त्याला वठणीवर आणण्याची गरज आहे व त्याचा लगाम तमाम वंचितांनी हातात घेण्याची गरज आहे, असे स्पष्ट प्रतिपादन आज येथे वंबआचे सर्वेसर्वा अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी केले व युतीवर टीकेची झोड उठविली. 

ते आमखास मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलत होते. सभेला मोठी गर्दी होती.‘असदुद्दीन ओवेसी हा चांगला माणूस आहे, पण त्यांचे साथीदार चुकीचे आहेत, असा टोला त्यांनी इम्तियाज जलील यांचे नाव न घेता मारला व मुुस्लिम बांधवांना वंबआबरोबर राहण्याचे आवाहन केले. 
वंबआ सत्तेत आल्यास घनकचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचे व उकाई धरणाचे पाणी औरंगाबादपर्यंत आणण्याचे आश्वासन आंबेडकर यांनी दिले. मध्यचे अमित भुईगळ, फुलंब्रीचे जगन्नाथ रिठे, औरंगाबाद पश्चिमचे संदीप शिरसाट, पैठणचे विजय चव्हाण या उमेदवारांची भाषणे झाली. ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष  नायब अन्सारी यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची प्रशंसा करीत मुस्लिम समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य करणारे ते एकमेव नेते होत, असे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. गोविंद दळवी यांनी, आता वंचित बहुजन आघाडीची लढाई भाजप- सेनेविरुद्ध असल्याचे जाहीर केले. रवी तायडे यांनी सूत्रसंचालन केले तर जिल्हाध्यक्ष महेश निनाळे यांनी आभार मानले. प्रारंभी, समता सैनिक दलाने बाळासाहेबांना सलामी दिली. 

राहुल गांधींना प्रेमाचा सल्ला ‘राफेलवर बोलू नको’
बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भाषणात राहुल गांधी यांचा उल्लेख असा केला : हा राहुल गांधी का प्रचारात आला? कुंभकर्णासारखा झोपला होता, हेच बरं होतं. ३७०, राफेलचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत काय संबंध? राहुलला माझा प्रेमाचा सल्ला आहे. राफेलवर बोलू नकोस. पोरं तुझी टिंगल करतात. राफेलवर  मनमोहनसिंग यांनी अधिकृतपणे बोलावं. त्यांनी तोंड उघडलं तर नरेंद्र मोदी यांचे कपडे फाटतील.

Web Title: Need to take the charge of BJP's crazy Horse : Balasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.