अत्यावश्यक सेवांवर आणखी निर्बंध; दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच राहणार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 12:38 PM2021-04-17T12:38:50+5:302021-04-17T12:39:34+5:30

१४ एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाचाही फज्जा उडत असून, विनाकारण लोक बाहेर पडताना दिसत आहेत.

Further restrictions on essential services; Shops will now be open from 7 a.m. to 1 p.m. | अत्यावश्यक सेवांवर आणखी निर्बंध; दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच राहणार सुरु

अत्यावश्यक सेवांवर आणखी निर्बंध; दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच राहणार सुरु

googlenewsNext
ठळक मुद्देलोकप्रतिनिधी व व्यापारी महासंघाने पालकमंत्र्यांकडे केली होती मागणी

औरंगाबाद : ‘ब्रेक द चेन’साठी लावण्यात आलेले निर्बंध आणखी कडक करत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उद्यापासून (शनिवार) सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच चालू राहणार आहेत. यासंदर्भातील सविस्तर आदेश शनिवारी सकाळी काढण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली.

फळांची विक्री आणि मेडिकल दुकाने यांना दुपारनंतर तीन तासांचा वेळ दिला जाणार आहे, तर इतर अत्यावश्यक सेवांनाही उद्याच्या आदेशात निश्चित वेळ ठरवून दिली जाणार आहे.१४ एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाचाही फज्जा उडत असून, विनाकारण लोक बाहेर पडताना दिसत आहेत. ‘ब्रेक द चेन’साठी आणखी कडक निर्बंध लागू करण्याची आवश्यकता शुक्रवारी सिंचन भवन येथे झालेल्या लोकप्रतिनिधी, व्यापारी महासंघ व शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

बैठकीस पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. आपल्या भावना समजून घेऊन जिल्हाधिकारी, मनपा प्रशासक व पोलीस आयुक्तांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दुपारी दिले. लोकप्रतिनिधींच्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर टाकण्याची जबाबदारी आ. अंबादास दानवे यांच्यावर टाकण्यात आली. त्यानुसार आ. दानवे हे दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटले. या भेटीमध्ये त्यांनी लोकप्रतिनिधींच्या भावना जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातल्या.

रस्त्यावर अनावश्यक गर्दी
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत किराणा दुकान, दूध, भाजीपाला, पेट्रोल पंप आदी सुविधा सुरू आहेत. वारंवार सूचना देऊनही शहरातील नागरिक दिवसभर घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे संचारबंदीचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. यासंदर्भात विचार करण्यासाठी आयोजित बैठकीत खा. इम्तियाज जलील, आ. अंबादास दानवे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. सतीश चव्हाण, आ. अतुल सावे, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, महासचिव लक्ष्मीनारायण राठी, अजय शहा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे तनसुख झांबड, मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष प्रफुल्ल मालानी, केमिस्ट असोसिएशनचे महासचिव विनोद लोहाडे, निखिल सारडा, तसेच महापालिका उपायुक्त अर्पणा थेटे व पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांची उपस्थिती होती.

लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सूचना
- अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सुरू असलेली दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवावीत.
- सध्या रमजान महिना सुरू असल्याने सायंकाळी ठरावीक वेळेत विक्रेत्यांना फळे विक्रीसाठी मुभा द्यावी.
- ज्याठिकाणी हॉस्पिटल आहेत तेथील मेडिकल २४ तास सुरू राहू द्यावीत. मात्र, इतर ठिकाणी असलेली मेडिकलची दुकाने उघडी ठेवण्यासंदर्भात प्रशासनाने वेळेचे नियोजन करावे.
- रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार होऊ नये, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी.

आज सुधारित आदेश
लोकप्रतिनिधींच्या एका बैठकीत आज काही सूचना करण्यात आल्या. नंतर काही लोकप्रतिनिधी मला येऊन भेटले. सुधारित आदेश काढण्याचे अधिकार शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, कडक निर्बंधांसंबंधीचा आदेश शनिवारी सकाळी काढण्यात येणार आहे.
- सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी

Web Title: Further restrictions on essential services; Shops will now be open from 7 a.m. to 1 p.m.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.