वडिलांच्या हातावर उपचार करायचे आहेत, कोल्हापूरच्या आरती पाटीलची जिद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 04:01 AM2020-01-20T04:01:24+5:302020-01-20T04:02:01+5:30

- रोहित नाईक मुंबई : ‘माझे वडील शेतकरी आहेत. शेतात काम करताना त्यांच्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. ...

Want to treat his father's hand, Aarti Patil of Kolhapur stubbornly | वडिलांच्या हातावर उपचार करायचे आहेत, कोल्हापूरच्या आरती पाटीलची जिद्द

वडिलांच्या हातावर उपचार करायचे आहेत, कोल्हापूरच्या आरती पाटीलची जिद्द

googlenewsNext

- रोहित नाईक
मुंबई : ‘माझे वडील शेतकरी आहेत. शेतात काम करताना त्यांच्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. मुंबईत त्यांच्या हातावर उपचार करून घ्यायचे आहेत. मुंबई मॅरेथॉनमध्ये पदक जिंकल्याचा आनंद आहेच, पण यातून मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून सर्वप्रथम वडिलांच्या हातावर उपचार करून घेईन,’ असे मुंबई अर्धमॅरेथॉनमध्ये पहिल्याच प्रयत्नात रौप्य पदक जिंकलेल्या आरती पाटीलने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

मुंबई कस्टममध्ये हवालदार पदावर कार्यरत असलेल्या २३ वर्षीय आरतीने यंदा सर्वांचे लक्ष वेधले. मूळची कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव येथील असलेली आरती नाशिक येथील भोसला मिलेटरी स्कूलमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय धावपटू घडविलेल्या विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. आरतीचे वडील दत्तात्रय पाटील यांना शेतकामादरम्यान दुखापत झाली. यामुळे सरावसत्रामुळे गेले कित्येक महिने घरापासून दूर असलेल्या आरतीचे लक्ष आपल्या वडिलांकडे लागले आहे. त्यात कोल्हापूरमध्ये योग्य उपचार होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने तिने आता वडिलांना मुंबईमध्ये आणण्याचे ठरविले आहे.

यात्रेतील धावण्याच्या स्पर्धांमुळे मॅरेथॉनची आवड निर्माण झाल्याचे सांगताना आरती म्हणते, ‘लहानपणी गावातील यात्रेमध्ये रंगणाऱ्या छोट्या-छोट्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असे. या मॅरेथॉनमध्ये मिळणाºया यशामुळे आत्मविश्वास वाढला आणि मी मॅरेथॉन खेळाकडे वळाले. नाशिक येथे मिळालेले प्रशिक्षण आणि योग्य डाएड या जोरावर कामगिरी अधिक सुधारली.’ त्याचप्रमाणे, आरतीने वडिलांसह आई वंदना व भाऊ विनायक यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांचे आभार मानताना आपल्या आतापर्यंतच्या वाटचालीचे सर्व यश परिवाराला दिले.

2009 साली १४ वर्षांखालील गटात खेळत असताना आरतीने १९ वर्षांखालील गटात पायका ग्रामीण राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य जिंकले आणि तेथून तिने मागे वळून पाहिले नाही.२०१६ साली पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळताना आरती आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेत अव्वल भारतीय धावपटू ठरली होती. कविता राऊतला प्रेरणास्थान मानणाºया आरतीने आता २०२२ साली होणाºया आशियाई क्रीडा स्पर्धेत ५ हजार व १० हजार मीटर स्पर्धेत पदक मिळविण्याचे ध्येय ठेवले आहे.

Web Title: Want to treat his father's hand, Aarti Patil of Kolhapur stubbornly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.