सांगलीत जिल्हा निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धांचे बेकायदेशीर आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 15:48 IST2021-01-07T15:44:58+5:302021-01-07T15:48:42+5:30
Sports CoronaVirus Sangli- कोविड काळात क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धांना शासनाने परवानगी दिलेली नाही, तरीही सांगलीतील काही संघटना त्यांचे विनापरवाना आयोजन करत आहेत. त्यांना प्रतिबंध करण्याची मागणी सांगली जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सांगलीत जिल्हा निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धांचे बेकायदेशीर आयोजन
सांगली : कोविड काळात क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धांना शासनाने परवानगी दिलेली नाही, तरीही सांगलीतील काही संघटना त्यांचे विनापरवाना आयोजन करत आहेत. त्यांना प्रतिबंध करण्याची मागणी सांगली जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
संघटनेचे सचिव संजय परमणे व अध्यक्ष ए. एल. पाटील यांनी सांगितले की, १४ ते २० वर्षे वयोगटातील मुले व मुलींसाठी कनिष्ठ गट मैदानी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न काही संघटना करत आहेत. त्यांना शासनाची परवानगी नाही, तरीही नियमबाह्यरित्या आयोजन केले जात आहे. कोरोनामुळे सध्या फक्त सरावाला परवानगी आहे, स्पर्धांना नाही. त्यामुळे य निवड चाचणीमध्ये खेळाडूंनी सहभागी होऊ नये.
ते म्हणाले की, मैदानी खेळांच्या राज्य संघटनेविषयी गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. ॲथलेटिक्स संघटनेतर्फे राज्य निवडीसाठी अधिकृत कनिष्ठ गट राष्ट्रीय मैदानी स्पर्धा लवकरच घेतली जाणार आहे, त्यासाठीची बैठक लवकरच होईल. त्यानंतर अधिकृत आयोजनाविषयी खेळाडूंना कळविले जाईल. या स्थितीत खेळाडू व पालकांनी आयोजकांच्या अधिकृततेविषयी खातरजमा करुनच सहभागी व्हावे.
अर्थकारणासाठी स्पर्धांचे आयोजन
परमणे, पाटील म्हणाले की, संघटनेच्या मान्यतेविषयी न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. पण कुरघोडी करण्यासाठी व अर्थकारणासाठी काहीजण स्पर्धा आयोजित करत आहेत. खेळाडूंनी भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी सहभागी होऊ नये.