जिल्हाबंदी कागदोपत्री; बिनधास्त दळणवळण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST2021-05-05T04:21:04+5:302021-05-05T04:21:04+5:30
फोटो पी ०४ तिवसा पान २ चे लिड तिवसा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने १५ मे पर्यंत ...

जिल्हाबंदी कागदोपत्री; बिनधास्त दळणवळण!
फोटो पी ०४ तिवसा
पान २ चे लिड
तिवसा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने १५ मे पर्यंत संचारबंदी वाढवली. आंतरजिल्हा प्रवेशावरही बंधन आणले. ई-पासशिवाय कोणालाही इतर जिल्ह्यातून ये-जा करण्यास बंदी घातली आहे. मात्र, तिवसा तालुक्यात ती बंदी निव्वळ कागदोपत्री दिसत आहे. कोण कुठून येत आहे, कोण कुठे जात आहे, याचा लेखाजोखा कुठल्याही यंत्रणेकडे नाही. बिनधास्त दळणवळण सुरू आहे. कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे तिवसा तालुका ‘हॉट स्पॉट’ बनला असतानाही प्रशासनासोबतच नागरिकांचा निष्काळजीपणा संकटात भर टाकणारा ठरला आहे.
जिल्हाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर तिवसा पोलिसांच्यावतीने वरखेड फाट्याजवळ बॅरिकेड लावण्यात आली. तेथे नाकाबंदी करीत पोलीस चौकीदेखील तैनात करण्यात आल. मात्र, आता ती पोलीस चौकी शोभेची वस्तू बनली आहे. तेथे केवळ बॅरिकेड शिल्लक आहेत. येथून सर्रासपणे वाहनांची ये-जा सुरू आहे. कोणत्याही प्रकारची तपासणी तेथे केले जात नाही.
राज्यात कोरोनाचा अक्षरशः उद्रेक होत आहे. त्यामुळे संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी कठोर जिल्हाबंदी घालण्यात आली. यात केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश देण्यात यावा, तर ई-पासशिवाय कोणालाही दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास बंदी घालण्यात आली. मात्र, हे केवळ कागदावर दिसून येत आहे. तिवसा पोलीस ठाण्याच्यावतीने लावण्यात आलेले चेक पोस्ट देखावा बनले आहेत. येथे एखादेवेळी पोलीस बसले असतात. मात्र, ते कोणालाही अडवत नाही. साधी विचारपूसदेखील करीत नाहीत. त्यांच्या निरुपद्रवीपणामुळे शासनादेशाला तिलांजली दिली गेली आहे.
बॉक्स
तिवसा हे गाव अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तालुका मुख्यालयाचे गाव आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत जिल्हाबंदी असूनही येथून सुसाट वाहतूक सुरू असते. या मार्गावरील वाहने तिवसा येथे थांबतात. या थांबलेल्यापैकी कोण कोरोना पॉझिटिव्ह, हे कळायला मार्ग नाही. तपासणी नाक्यावर कुणाचीही अँटिजेन तपासणी केली जात नाही. जिल्ह्यात येणाऱ्यांना आरटी-पीसीआर किंवा अँटिजेन अहवाल मागितला जात नाही.
या बातमीत दोन कोट येत आहेत.