-अखेर झोन अभियंता, कनिष्ठ लिपिकाचे निलंबन
By Admin | Updated: December 6, 2014 00:43 IST2014-12-06T00:43:35+5:302014-12-06T00:43:35+5:30
बांधकाम पाडण्याकरिता नोटीस बजावणे आणि ते बांधकाम न पाडल्यास २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी झोन अभियंता ...

-अखेर झोन अभियंता, कनिष्ठ लिपिकाचे निलंबन
अमरावती : बांधकाम पाडण्याकरिता नोटीस बजावणे आणि ते बांधकाम न पाडल्यास २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी झोन अभियंता व कनिष्ठ लिपिकांवर शुक्रवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत.
भाजीबाजार झोन क्र.५ येथे कार्यरत झोन अभियंता लक्ष्मण पावडे व कनिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर झोंबाडे यांनी स्थानिक नूरनगर येथील रहिवासी हाफीज मोहम्मद वाजीद मोहम्मद इद्रीस (३१) यांच्या गंभीरपूर, प्रगणे बडनेरा शेत सर्वे क्र. ३/२-८१ आर या जमिनीवर सुरु असलेले बांधकाम पाडण्याकरिता नोटीस बजावली होती. हे बांधकाम पाडायचे, रोखायचे असल्यास लक्ष्मण पावडे यांच्या सांगण्यावरुन कनिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर झोंबाडे यांनी २५ हजार रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भाची तक्रार हाफीज मो. वाजीद यांनी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. या तक्रारीच्या आधारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून २५ हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर झोंबाडे यांना सोमवारी अटक करण्यात आली होती. यावेळी झोन अभियंता लक्ष्मण झोंबाडे पसार झाला होता. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येथील खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात लक्ष्मण पावडे, ज्ञानेश्वर झोंबाडे या दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली. आयुक्त अरुण डोंगरे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ चे नियम ४ (१) (क) व महाराष्ट्र महापालिका अधिनियमचे कलम ५६ (२) (फ) नुसार तत्काळ त्यांना महापालिका सेवेतून निलंबित केले. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय महापालिका, उत्तर झोन क्र. १ हे राहील. निलंबन काळात त्यांना कुठलाही खासगी धंदा किंवा व्यवसाय करता येणार नाही. या काळात वेतन व इतर भत्ते देय राहतील, असे आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)