‘झेडपी’त लाल दिव्यासाठी रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 00:08 IST2017-03-09T00:08:22+5:302017-03-09T00:08:22+5:30
जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अद्याप कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

‘झेडपी’त लाल दिव्यासाठी रस्सीखेच
छुप्या बैठकी : काँग्रेस,भाजपच्या सत्तेसाठी हालचाली
जितेंद्र दखने अमरावती
जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अद्याप कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. किंबहुना काँग्रेस व भाजपने सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. परंतु भाजपने काँग्रेसला सहजासहजी सत्ता जाऊ द्यायची नाही, अशी पडद्याआड रणनीती आखली आहे. त्यामुळे २१ मार्च रोजी ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ हे स्पष्ट होईल, हे विशेष.
काँग्रेसने सर्वाधिक २६ जागा जिंकून जिल्हा परिषदेत पुन्हा ‘पंजा’च अव्वल असल्याचे सिद्ध केले आहे. चार सदस्य सोबत घेताच सत्तास्थापनेसाठी काँॅग्रेसचा मार्ग मोकळा होऊ शकते. प्रारंभी रिपाइंचा १ सदस्य काँॅग्रेसला अगोदरच मित्र म्हणून आला आहे. त्यामुळे काँग्रेस आजमितीला २७ सदस्य संख्येवर वर स्थिरावला आहे. आता काँग्रेसच्या तंबूत केवळ तीन सदस्यांची गरज आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी काँॅग्रेससोबत आघाडीचे संकेत दिले आहेत. तसेच काँॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीसुध्दा ज्या पक्षाचे सर्वाधिक सदस्य जास्त त्या ठिकाणी त्यांची हे सूत्र लागू केले आहे. परिणामी जिल्हा परिषदेत काँग्रेसला लाल दिव्यापासून सद्यातरी धोका नाही, असे राजकीय चित्र आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच सदस्य निवडून आले आहेत. मात्र पाचही सदस्य दोन गटाचे निवडून आले आहे. त्यामुळे काँग्रेसला सत्ता काबीज करताना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना विश्र्वासात घेऊन जादुई आकडा गाठावा लागेल. त्याशिवाय सत्तेचे समीकरण जुळणे अवघड असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे पाच सदस्य दोन गटात विभागल्या गेले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांची मनधरणी करावी लागणार आहे, तर दुसरीकडे भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या तंबूत ओढण्यासाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेत भाजपला सत्ता मिळाली. जिल्हा परिषदेतही १३ सदस्यांच्या भरोशावर ‘जुगाडबंदी’ करून सत्ता स्थापन करता येते काय? याचे सूक्ष्म नियोजन भाजप करीत आहे. काँग्रेस वगळता अन्य पक्षासोबत भाजप मैत्री करण्याच्या बेतात असल्याचे समजते. परंतु सत्ता काबीज करण्यासाठी ३० सदस्यांची आवश्यता आहे.
सद्यस्थितीत जिल्हा परिषदेत काँग्रेस २६, राष्ट्रवादी ५, भाजप १३, शिवसेना ३, प्रहार ५, युवा स्वाभिमान २, रिपाइं-१, बसपा १, अपक्ष १, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, लढा संघटना १ असे एकूण ५९ सदस्य निवडून आले आहेत. मात्र सत्ता स्थापनेसाठी ३० हा ‘मॅजिक फिगर’ कुणाकडेही नाही. काँग्रेससोबत रिपाइंचे एक सदस्य असल्याने ही संख्या २७ पोहोचली आहे. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला चार सदस्यांची आवश्यकता आहे. परंपरागत मैत्री असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत काँग्रेसची युद्धस्तरावर बोलणी सुरू आहे. भाजपला रोखणे हे काँग्रेस- राष्ट्रवादीचा अजेंडा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीत आघाडी होऊन सत्ता स्थापन केली जाईल, असे राजकीय चित्र आहे.
२०१२ मध्ये बदलेले होते सत्ता स्थापनेचे चित्र
जिल्हा परिषदेत गतवेळी सर्वाधिक सदस्य असलेल्या कॉग्रेसला सत्ता स्थापनेच्यावेळी मित्र पक्षाने दगाबाजी करुन सत्ता काबीज केली होती. २०१२ मध्ये काँग्रेसकडे येणारी सत्ता मित्रपक्षाने अभद्र युती करून मिळविली होती. परंतु त्यानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये शेवटी अडीच वर्षांसाठी सत्ता स्थापनेत काँग्रेसने सावध पवित्रा घेतला. अंतर्गत वाद, हेवेदावे गुंडाळून काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली होती. आताही हीच राजकीय खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे आहेत. मात्र सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ आमच्याकडे असल्याने कुठल्याही स्थितीत जिल्हा परिषदेवर यावेळीसुद्धा काँग्रेसचीच सत्ता राहील.
- बबलू देशमुख,
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
जिल्हा परिषदेत भाजपाकडे सत्तेसाठी स्पष्ट बहुमत नाही. मात्र राजकीय घडामोडींवर आमचे बारकाईने लक्ष आहे. सत्ता स्थापनेसाठी सध्या तरी काही निर्णय नाही. प्रसंगानुरुप भाजप निर्णय घेईल
- दिनेश सूर्यवंशी,
जिल्हाध्यक्ष, भाजपक्ष