जिल्हा परिषद विषय समिती सदस्य निवडीची प्रक्रिया रद्द
By Admin | Updated: April 12, 2015 00:19 IST2015-04-12T00:19:12+5:302015-04-12T00:19:12+5:30
जिल्हा परिषदेतील विषय समिती सदस्यांच्या निवडीचा तिढा अद्यापही सुटला नाही.

जिल्हा परिषद विषय समिती सदस्य निवडीची प्रक्रिया रद्द
निवडणूक : विभागीय आयुक्तांच्या निर्णयाचे वेध
अमरावती : जिल्हा परिषदेतील विषय समिती सदस्यांच्या निवडीचा तिढा अद्यापही सुटला नाही. अशातच अध्यक्ष सतीश उईके यांनी विशेषाधिकाराचा वापर करून विषय समितीमधील सदस्य निवडीची प्रक्रिया रद्द केली आहे. त्यामुळे या प्रक्रियेबाबत आता विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विभागीय आयुक्त यांच्याकडून जिल्हा परिषद प्रशासनाने मार्गदर्शन मागितले आहे. त्यामुळे ते यासंदर्भात काय मार्गदर्शन करतात याकडे जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, सदस्य व राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे. विषय समित्यांची पदे रिक्त आहेत. या पदासाठी अनेक सदस्यांनी अर्ज केला होता. यातील बहुतांश सदस्य इतर विविध विषय समितीवर निवडून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे या प्रक्रियेला जिल्हा परिषद सदस्य अभिजित ढेपे यांनी विभागीय आयुक्तांकडे आव्हान दिले होते. विभागीय आयुक्तांनी निवडणूक प्रक्रिया नियमानुसार घेण्याचे आदेश दिल्यानंतर सदस्य निवडीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली.
आता तर अध्यक्षांनी विशेषाधिकार वापरून प्रक्रिया रद्द करून पुढील निर्णय विभागीय आयुक्तांकडे सोपविला आहे. त्यामुळे या विषयीची उत्सुकता मावळली आहे. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर याप्रकरणी काय पाऊल उचलतात, याकडे सगळयंचे लक्ष लागले आहे. तुुर्तास विषय समिती सदस्य निवडीच्या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. (प्रतिनिधी)