शेतकरी कर्जमुक्तीसाठी युवा स्वाभिमानचा पुढाकार
By Admin | Updated: June 6, 2017 00:09 IST2017-06-06T00:09:02+5:302017-06-06T00:09:02+5:30
आमदार रवी राणांद्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेने शेतकरी कर्जमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे.

शेतकरी कर्जमुक्तीसाठी युवा स्वाभिमानचा पुढाकार
अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : बळीराजाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आमदार रवी राणांद्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेने शेतकरी कर्जमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय, हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पांठिबा जाहीर करून सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. काहीही करा, बळीराजाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढा, अशी आर्त हाक देण्यात आली.
जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना देण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांच्या न्यायिक मागण्या मान्य करण्याची मागणी करण्यात आली. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली असून ती त्वरेने खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा, तूर खरेदीच्या मोबदल्याची रक्कम दोन दिवसांच्या आत शेतकऱ्यांना मिळावी, शेतकऱ्यांना बी-बियाणे वेळेवर देण्यात यावे, बोगस बियाणे विकले जाणार नाही याची काळजी कृषी विभागाने घ्यावी, सततच्या नापिकीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी बँकांनी पीककर्ज उभारून द्यावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू रोडगे, जि.प. सदस्य मयुरी कावरे, दिनेश टेकाम, प्रदीप थोरात, जया तेलखंडे, रश्मी घुले, मीना डकरे उपस्थित होते.