अमरावतीत तरुणाची निर्घृण हत्या, दुसरा गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 18:20 IST2022-02-18T13:46:44+5:302022-02-18T18:20:39+5:30
स्थानिक फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा तलावाजवळ दोन तरुणांवर चाकूसारख्या तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला करण्यात आला.

अमरावतीत तरुणाची निर्घृण हत्या, दुसरा गंभीर जखमी
अमरावती : स्थानिक फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा तलावाजवळ दोन तरुणांवर चाकूसारख्या तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. याबाबत काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत दोन्ही जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. तेथे एकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
आकाश ऊर्फ अप्पू अनिल खिराडे (२२, रा. वृंदावन कॉलनी) असे मृताचे नाव आहे. सुबोध धवने (रा. तपोवन) असे गंभीर जखमीचे नाव आहे. दोघांवरही हल्ला करून अज्ञात हल्लेखोर पसार झाले. सायंकाळी ७ च्या सुमारास काही स्थानिकांना राजुरा गावानजीकच्या तलावाजवळ दोन तरुण मरणासन्न अवस्थेत दिसून आले. दोघांच्याही शरीरावर तीक्ष्ण हत्याराचे अनेक वार होते. माहिती मिळताच फ्रेजरपुराचे ठाणेदार अनिल कुरळकर व पोलीस निरीक्षक नितीन मगर हे घटनास्थळी पोहोचले. दोघांनाही रुग्णालयात आणण्यात आले. पंचनामा करून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध चालविला आहे.
गंभीर जखमी असलेल्या सुबोध धवनेदेखील बेशुद्धावस्थेत असल्याने हल्ला नेमका कुणी केला व कारण अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही, असे नितीन मगर यांनी सांगितले. तीक्ष्ण हत्यारासोबतच दगडाचादेखील वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबत फ्रेजरपुरा पोलिसांत अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.