वन्यजीव संवर्धनासाठी तरूणांचा पुढाकार हवा
By Admin | Updated: March 3, 2017 00:25 IST2017-03-03T00:25:27+5:302017-03-03T00:25:27+5:30
वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. आज जगभरातील एकूण लोकसंख्येपैकी २५ टक्के लोकसंख्या तरूण आहे.

वन्यजीव संवर्धनासाठी तरूणांचा पुढाकार हवा
युनोचे आवाहन : आज जागतिक वन्यजीव दिन
वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. आज जगभरातील एकूण लोकसंख्येपैकी २५ टक्के लोकसंख्या तरूण आहे. विशेष म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल ५८ टक्के लोकसंख्या तरूण आहे. म्हणून वन्यजीव संवर्धन व संरक्षण करण्यात तरूणांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. तरूणांच्या हाती केवळ त्या त्या देशाच भविष्यच नसून जगभरातील सर्व वन्यजीवांच भविष्य त्यांच्याच हाती आहे. गेल्या ४० वर्षांत जगभरातील अर्धे वन्यजीवन धोक्यात आले आहे. अधिवास धोक्यात येणे, वन्यजीव शिकार व त्यांची तस्करी अश्या अनेक अंगाने त्यांची संख्या कमालीची कमी झाली आहे. हस्तीदंतासाठी आजवर १ लाख आफ्रिकन हत्ती शिकार झालेत. खवले मांजर हा जगात सर्वाधिक मारला जाणारा सस्तन प्राणी ठरला आहे. १० वर्षांत गेंड्याच्या शिकारीत ९ हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे.
वन्यजीव शिकार थांबून जगातील सर्व वन्यजीव प्रजातींचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने ३ मार्चला जगभरात जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जाणार आहे. २०१७ या वर्षीच जागतिक वन्यजीव दिन हा विशेषत: तरूणांना सोबत घेऊन साजरा करण्याचे जागतिक पातळीवर ठरविण्यात आले.
३ मार्च १९७३ ला ‘कन्वेन्शन आॅन इंटरनॅशनल ट्रेड ईन एनडेंजर्ड स्पेसिज आॅफ वाईल्ड फ्लोरा अॅन्ड फाऊना हा आंतरराष्ट्रीय करारावर जगभरातील सर्व देशांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या धर्तीवर सन २०१३ पासून या कराराच्या अनुषंगाने हा दिन साजरा करण्यात येतो. ‘तरूणाईची हाक ऐका’ या मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरून २०१७ या वर्षीचा जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जाणार आहे. यातून जगभरातील तरूण पिढी वन्यजीव संवर्धनसाठी एकत्र करण्याचा युनोचा मानस आहे. युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेमार्फत न्यूयॉर्कमधील मुख्यालयातसुद्धा हा दिवस साजरा करण्यात येत आहे.
प्रत्येक देशातील स्थानिक तरूणांना वन्यजीव संवर्धनासाठी एकत्रित करून जगभर सक्रिय व तरुण नेतृत्व उभे करण्याचा मानस या दिनानिमित्त केला आहे. तरुणांनी एकत्र येऊन स्थानिक पातळीवर हा दिवस साजरा करावा. तसेच प्राणी, पक्षी व वन्यजीव शिकार, वन्यप्राण्यांची खरेदी-विक्री होत असेल तर नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधावा व स्वयंसेवी संस्थांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.