लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा/अमरावती : नकली तृतीयपंथी असल्याच्या संशयावरून खऱ्या तृतीयपंथीयांनी दोन तरुणांना नग्न करून त्यांचे डोक्याचे केस कापल्याची धक्कादायक घटना बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत निंभोरा झोपडपट्टीत गुरुवारी दुपारी घडली. याचा व्हिडीओ ‘सोशल मीडियावर’ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी तरुणांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी चार तृतीयपंथीयाविरुद्ध भादंविचे कलम ३२३, ५०४, ५०६, ५०० अन्वये गुन्हा नोंदविला. व्हिडीओत काही तृतीयपंथी तरुणांना नग्न करून त्यांचे केस कापत असल्याचे दिसत आहे. सदर तरुणांना नृत्य करण्यासाठी बोलावून नग्न करून केस कापले व बदनामी केली, असे तरुणांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सीपी कार्यालयातही आपबीती कथन केली.
बडनेरा पोलिसांनी नोंदविला गुन्हा, शनिवारी वाद पोहचला सीपी कार्यालयात
तृतीयपंथीयांचा ताफा धडकला तरुणांनी बडनेरा ठाण्यात तक्रार केल्यानंतर तृतीयपंथीयांच्या व्यवसायातील असली-नकलीचा वाद पुन्हा शनिवारी दुपारी पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचला. खऱ्या तृतीयपंथीयांच्या धाकाने बनावट तृतीयपंथी म्हणून फिरणारे दोन तरुणांनी शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास सीपी कार्यालयात आसरा घेतला. परंतु त्याचवेळी त्यांचा पाठलाग करीत ऑटोतून २५ ते ३० तृतीतपंथीसुध्दा सीपी कार्यालयात पोहोचल्याने प्रचंड गोंधळ उडाला. तृतीयपंथीयांनी आपबीती पोलिसांसमोर मांडली. त्या तरुणांनीही त्यांच्यासोबत घडलेल्या गंभीर प्रकारचे कथन पोलिसांसमोर केले. फ्रेजरपुरा पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेतले.
तरुणांनी दिलेल्या तक्रारीनुसार व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी तृतीयपंथीयांविरुद्ध अब्रू नुकसानाची गुन्हा नोंदविला आहे. सदर प्रकरण तपासात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.- बबन पुसाटे, पोलीस निरीक्षक, बडनेरा