आईच्या अस्थींचं विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तरूणाचा नदीत बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 16:56 IST2018-01-27T16:56:04+5:302018-01-27T16:56:33+5:30
तिवसा तालुक्यातील तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर येथे वर्धा नदीवर आईच्या अस्थींचे विसर्जन करताना तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

आईच्या अस्थींचं विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तरूणाचा नदीत बुडून मृत्यू
अमरावती- तिवसा तालुक्यातील तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर येथे वर्धा नदीवर आईच्या अस्थींचं विसर्जन करताना तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. प्रजासत्ताकदिनी ही दुर्दैवी घटना घडली. यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील आसेगाव देवी इथल्या श्याम ऊर्फ गोपाळ वामनराव ऐवतकर (२२) असं मृताचं नाव आहे. तो पुण्याला खासगी कंपनीत नोकरी करीत होता. आईच्या अस्थींचं वर्धा नदीत विसर्जन करण्यासाठी तो नातेवाइकांसोबत कौंडण्यापूर येथील घाटावर शुक्रवारी आला होता. दुपारी १२.३० च्या सुमारास घाटांच्या पायऱ्यांवरून नदीत उतरत असताना गोपाळचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याच्यासोबत असलेल्या कोणालाही पोहता येत नसल्याने नदीच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
मृताचा भाऊ रवि वामनराव ऐवतकर (२८) यांनी कुऱ्हा पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक आशिष चौधरी यांनी घटनास्थळाच पंचनामा केला व मृतदेह विच्छेदनासाठी अमरावतीला पाठविला.
दोन्ही घाटांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कौंडण्यपूर येथे येणाऱ्या प्रत्येक लोकांची नोंद येथील स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत घेते. घाट स्वच्छता आणि देखभाल खर्च म्हणून शुल्क आकारते. पण, येथील सुरक्षेची जबाबदारी आमची नाही, अशी भूमिका घेतली जाते. येथील दोन्ही घाटांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, २०१७ मध्ये पाच जणांना येथे जीव गमवावा लागला.