यंदा पर्युषण महापर्व 'फिजिकल डिस्टन्सिंग'द्वारेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:01:58+5:30
भातकुली येथे प्रबलसागरजी महाराज यांचा महिनाभरापासून मुक्काम आहे. भ्रमंतीदरम्यान ते भातकुलीत पोहोचले. लॉकडाऊनमुळे त्यांनी भातकुलीतच मुक्काम केला. हल्ली सार्वजनिक दर्शनासाठी जैन मंदिर बंद आहे. पूजा- अर्चा मंदिरात सुरू आहे. भातकुलीचे जैन मंदिर प्राचीन असल्याची माहिती अभिनंदन पेंढारी यांनी दिली.

यंदा पर्युषण महापर्व 'फिजिकल डिस्टन्सिंग'द्वारेच
श्यामकांत सहस्त्रभोजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जैन धर्मीयांच्या पर्युषण महापर्वाला सुरुवात झाली आहे. भाद्रपद कृष्ण पक्ष ते भाद्रपद शुक्ल पंचमीपर्यंत आठ दिवस जैन धर्माचे अनुयायी हा उत्सव साजरा करतात. कोरोना नियमावलीमुळे यंदा हा उत्सव जाहीररीत्या साजरा न करता घरातच उपासना, उपवास आणि ‘कल्प सूत्र’ व ‘अंतगडदसा सूत्र’ या ग्रंथांचे वाचन करून साजरा केला जात आहे.
प्रबलसागरजी महाराज भातकुलीत
भातकुली येथे प्रबलसागरजी महाराज यांचा महिनाभरापासून मुक्काम आहे. भ्रमंतीदरम्यान ते भातकुलीत पोहोचले. लॉकडाऊनमुळे त्यांनी भातकुलीतच मुक्काम केला. हल्ली सार्वजनिक दर्शनासाठी जैन मंदिर बंद आहे. पूजा- अर्चा मंदिरात सुरू आहे. भातकुलीचे जैन मंदिर प्राचीन असल्याची माहिती अभिनंदन पेंढारी यांनी दिली.
ऑनलाईन प्रवचन
-श्री पर्वधिराज पर्युषण महापर्व हे १५ ऑगस्टपासून प्रारंभ झाले. कोराना नियमावलीमुळे प्रवचन संघात विराजमान परमपूज्य साध्वी वैराग्यनिधी श्रीजी महाराज यांचे सकाळी ९ वाजता लाईव्ह प्रवचन उपलब्ध आहे. अनेक अनुयायी या ऑनलाईन सेवेचा लाभ घेत आहेत.
-औरंगाबाद येथील गुरू गणेशनगरात विराजमान पृूज्य प्रणवमुनीजी म.सा. आदीठाणा व पूज्य किरणसुधाजी म.सा., पूज्य प्रशांतजी म.सा. आदीठाणा ११ यांची पर्युषण महापर्वात सुखशांतीच्या मंगल क्षणांसाठी आराधना सुरू आहे. या प्रवचनाचा अनुयायी लाभ घेत असल्याची माहिती बडनेरा मार्गावरील श्री जैन श्वेतांबर दादावाडी संस्थानचे उपाध्यक्ष कोमल बोथरा यांनी दिली.
भाजीबाजारात १२५ वर्षे जुने बडा जैन मंदिर
स्थानिक भाजीबाजारात १२५ वर्षे जुने जैन मंदिर आहे. बडा जैन मंदिर नावाने ते प्रसिद्ध आहे. हे मंदिर तीर्थक्षेत्र ठरले आहे. कोरोनामुळे हल्ली मंदिरात अनुयायांना प्रवेशमनाई आहे. पुजाऱ्यांकडून नियमित पूजा-अर्चा केली जात आहे.
कोरोना नियमावलीमुळे पर्युषण पर्व सार्वजनिकरीत्या साजरे न करता यंदा ते घरीच साजरे केले जात आहे. एरवी शेवटच्या दिवशी उत्सवी वातावरणाला भरते येते. यंदा मात्र अत्यंत साधेपणाने महापर्वाची सांगता होईल.
- सुदर्शन गांग,
राष्ट्रीय उपाध्यक्ष,
भारतीय जैन संघटना