यंदाच्या दिवाळीत पेटणार जुन्याच कापसाच्या वाती
By Admin | Updated: October 22, 2014 23:11 IST2014-10-22T23:11:55+5:302014-10-22T23:11:55+5:30
जिल्ह्यात रबीसाठी ७ लाख २० हजार पेरणीक्षेत्र आहे. यापैकी २ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली. मात्र दीड महिना उशिरा पाऊस, पावसाचा खंड व सध्या कपाशीवर असलेला पोटऱ्या माशीचा

यंदाच्या दिवाळीत पेटणार जुन्याच कापसाच्या वाती
अमरावती : जिल्ह्यात रबीसाठी ७ लाख २० हजार पेरणीक्षेत्र आहे. यापैकी २ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली. मात्र दीड महिना उशिरा पाऊस, पावसाचा खंड व सध्या कपाशीवर असलेला पोटऱ्या माशीचा प्रादुर्भाव व लाल्यामुळे कपाशीचे पीकच धोक्यात आले आहे. यावेळेपर्यंत किमान २ ते ३ वेचाई होतात. यंदा मात्र कपाशीची पहिलीच वेचाई (सीतादही) झालेली नाही. त्यामुळे दिवाळीच्या आनंदात विरजण पडले आहे. या विपरीत स्थितीत दिवाळीला बळीराजाच्या घरी पेटविल्या जाणाऱ्या पणतीत जुन्याच कापसाच्या वाती राहणार आहेत.
जिल्ह्यात रबीची पेरणी जून महिन्यात होते. यावर्षी मात्र आॅगस्ट अखेरपावेतो पावसाचा पत्ताच नव्हता परिणामी सप्टेंबरपर्यंत ७ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली यापैकी ३ लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीन व २ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली.
यंदाचे सोयाबीन निकृष्ट बियाणे, पिवळा मोझॅकचा अटॅक यामुळे शेंगा पोचट होऊन पूर्णत: व्यर्थ गेले. नगदी पीक (कॅश क्रॅप) हातचे गेल्याने आधीच शेतकरी संकटात आला. किमान कपाशी साथ देईल, अशी अपेक्षा असताना दिवसाचे उष्णतामान, रात्रीची थंडी, जमिनीत नसणारी आर्द्रता यामुळे त्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाला. आधीच ४५ दिवस उशिरा झालेली पेरणी यामुळे कपाशीचे २ ते ३ वेळा वेचाई होण्याच्या काळात कपाशी पात्या फुलावर आहे.
या कपाशीवर प्रतिकूल हवामान अन्नद्रव्याची कमतरता यामुळे कोकडा व लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. रसशोषण करणाऱ्या किडीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे कपाशीचे बोंड पूर्णत: उघडत नाही व निघणारी रूईदेखील निकृष्ट दर्जाची राहणार आहे. यामुळे सरासरी उत्पन्नात किमान ५० टक्क्यांनी घट येणार आहे.