समितीपश्चात मराठी भाषा विद्यापीठाची कार्यकक्षा, उपमुख्यमंत्र्याच्या आढाव्याने गती
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 14, 2023 16:52 IST2023-04-14T16:50:30+5:302023-04-14T16:52:03+5:30
उपलब्ध तात्पुरत्या व्यवस्थेमध्ये कारणार

समितीपश्चात मराठी भाषा विद्यापीठाची कार्यकक्षा, उपमुख्यमंत्र्याच्या आढाव्याने गती
अमरावती : अर्थसंकल्पातील घोषणेप्रमाणे रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठाचा कारभार उपलब्ध तात्पुरत्या व्यवस्थेमध्ये सुरू होणार आहे. यासाठी महत्त्वाची असणाऱ्या समितीच्या गठणासाठी आठवडाभरात शासनादेश काढण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा भेटीदरम्यान दिली. या समितीच्या अहवालानंतरच मराठी भाषा विद्यापीठाची कार्यकक्षा ठरून कामकाजाला गती येणार आहे.
मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेबाबत उच्च तंत्रविभागाकडून एक समिती गठित करण्यात येत आहे. या समितीत महानुभाव पंथाचा एक प्रतिनिधी राहणार आहे. या समितीद्वारा विद्यापीठाचे स्थान, आवश्यक जमीन, त्यावर बांधकाम, सर्वसाधारण रचना, खर्चाचा अंदाज, याशिवाय अध्यापक व अध्यापकेतर कर्मचारी किती असावेत व त्यासाठी पडणारा आर्थिक भार याचा अहवाल शासनाला देणार आहे.
मराठी विद्यापीठाचा कारभार सुरू करण्यासाठी रिद्धपूर विकास आराखडांतर्गत बांधण्यात आलेली भक्तनिवासची इमारत, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे यात्री निवासाची इमारत, तसेच रिद्धपूर विकास आरखडांतर्गत बांधण्यात आलेल्या थीम पार्कमधील इमारतींमध्ये विद्यापीठाचा तात्पुरत्या स्वरूपात कारभार सुरू होऊ शकतो, असा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या संदर्भात दिला आहे. याशिवाय मौजा कोळविहीर, सहादापूर, दाभेरी व इस्माईलपूर येथील वनविभागाची १५२.७८ हेक्टरवर्ग जमीन याशिवाय खासगी जमीन अधिग्रहीत करता येऊ शकते, असे अहवालात नमूद आहे.