विनयभंग करून महिला पोलिसावर हल्ला
By Admin | Updated: September 19, 2016 00:13 IST2016-09-19T00:13:26+5:302016-09-19T00:13:26+5:30
बसस्थानक परिसरात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या महिला पोलिसाचा विनयभंग करून हल्ला करण्यात आला.

विनयभंग करून महिला पोलिसावर हल्ला
बस स्थानकाजवळील घटना : दोन आरोपींना अटक
अमरावती : बसस्थानक परिसरात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या महिला पोलिसाचा विनयभंग करून हल्ला करण्यात आला. ही घटना १६ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी शनिवारी रतन वसंत उके (३६,रा. राजमातानगर) व अण्णा देशमुख नावाच्या इसमाला अटक केली आहे.
महिला पोलीस व पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय (बं.न. १२४६) हे १६ सप्टेंबर रोजी गणपती बंदोबस्तानिमित्त बसस्थानकावर वाहतूक नियंत्रित करीत होते. दरम्यान आरोपीने महिला पोलिसाचा असभ्य भाषेत बोलून विनयभंग केला. याबद्दल महिला पोलीसाने आरोपींना जाब विचारला असता आरोपींनी त्यांना अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच मारण्यास अंगावर धावून गेले आणि त्यांचा गळा पकडून हॉटेलच्या भट्टीवर ढकलून दिले. या हल्ल्यात महिला पोलिसाच्या उजव्या हाताला व पायाला मूका मार लागला. आरोपींनी सरकारी कामात अडथळा निर्माण करून महिला पोलिसाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केल्याने पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. या घटनेची तक्रार शनिवारी महिला पोलिसाने शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरूद्ध भादंविच्या कलम ३५४, ३५३, २९४, ३३२, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आर.बी. गायकवाड करीत आहे.
तीन दिवसांत दोनदा पोलिसांवर हल्ले
शहरावासियांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर मागील तीन दिवसांत दोनदा हल्ले झालेत. १५ सप्टेंबर रोजी दामिनी पथकातील महिला पोलिसावर दोघांनी हल्ला चढविला होता. आता तीन दिवसांत ही दुसरी घटना घडली आहे.