महिलांनो, आयोग तुमच्या पाठीशी!
By Admin | Updated: July 7, 2014 23:20 IST2014-07-07T23:20:26+5:302014-07-07T23:20:26+5:30
महिला आयोगाकडे राज्यभरातून अन्यायग्रस्त महिला आपल्या तक्रारी घेऊन येतात. मात्र, राज्याच्या कानाकोपाऱ्यातून महिलांना मुंबईला ये-जा करणे परवडत नाही.

महिलांनो, आयोग तुमच्या पाठीशी!
सुनावणी कार्यक्रम : महिला आयोगाच्या अध्यक्षांचे प्रतिपादन
अमरावती : महिला आयोगाकडे राज्यभरातून अन्यायग्रस्त महिला आपल्या तक्रारी घेऊन येतात. मात्र, राज्याच्या कानाकोपाऱ्यातून महिलांना मुंबईला ये-जा करणे परवडत नाही. महिलांनी आयोगाकडे येण्यापेक्षा आयोगानेच महिलांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विभागीय पातळीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता अमरावती विभागातील पीडित, अन्यायग्रस्त महिलांनी कुणालाही घाबरायचे नाही. हा आयोग त्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुसीबेन शहा यांनी आज सोमवारी येथे दिली.
राज्य महिला आयोगाच्या विभागीय खंडपीठ व विभागीय सुनावणी कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर जि.प अध्यक्ष सुरेखा ठाकरे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या आर्शा मिरगे, विजया बांगळे, चित्रा वाघ, विभागीय उपायुक्त माधव चिमजी, उपायुक्त माधव बोरखडे यांची उपस्थिती होती.
महिलांना त्यांच्या अधिकारांची माहिती असणे आवश्यक असल्याचे सांगत शहा म्हणाल्या, महिलांनी अत्याचार सहन करु नये, आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला जरूर वाचा फोडावी, महिला घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लैंगिक हिंसाचारालाही बळी पडतात. अनेक महिला आपले नाव कलंकित होईल, या भीतीने आपल्यावरील लैंगिक अत्याचार सहनच करीत जातात. अशा महिलांनी अजिबात न घाबरता धाडसाने समोर येऊन महिला व बालकल्याण विभागाच्या महिला समुपदेशन केंद्राची मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
आयोगाच्या सदस्या तथा अमरावती विभागाच्या प्रमुख आशा मिरगे यांनी २ आॅगस्टपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी अमरावती विभागातील अन्यायग्रस्त महिलांची सुनावणी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात घेणार असल्याचे प्रास्ताविकातून सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेत स्थापन केलेल्या महिला मदत केंद्राची माहिती दिली.
सर्वप्रथम दीप प्रज्ज्वलन करून राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच आयोगाच्या अमरावती विभागीय खंडपीठाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर तीन बेंच तयार करण्यात येऊन विभागातून आलेल्या पीडित महिलांच्या तक्रार अर्जांवर सुनावणी करण्यास सुरूवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन क्षीप्रा मानकर तर आभार प्रदर्शन जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कैलास घोडके यांनी केले. याप्रसंगी महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, अर्जदार महिला, गैरअर्जदार आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)