अमरावती : एनसीआरबीचा सन २०२० चा अहवाल नुकताच जाहीर झाला. त्यात महिलांविषयक गुन्ह्यांचा वाढलेला आलेख चिंताजनक आहे. शहरातील संघटित गुन्हेगारींवर पोलिसांचा वचक असला, तरी महिलांवरील अत्याचार, त्यांना फूस लावून पळविणे, विनयभंग थांबवायचे असेल तर केवळ पोलिसांवर दोष देण्यात हशील नाही. त्यासाठी आवश्यकता आहे सामाजिक जागराची अन् अनेकांचे नैतिक अध:पतन थांबविण्याची. सन २०२० मध्ये शहरात १५ खून, तर बलात्काराच्या ८१ घटनांची नोंद झालेली आहे. ६१ जणींना फूस लावून पळविण्यात आले.
अहवालानंतरची आकडेवारी काय सांगतेय?सन २०२० सन २०२१खून १५ : १५
बलात्कार ८१ : ६९फूस लावून पळविणे : ६१ : ६८
या घटनांनी हादरले होते शहर
घटना क्रमांक १
मुलगी आणि जावयाच्या भांडणात मिटवण्यासाठी मध्यस्थी गेलेल्या सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना दसरा मैदान रोड स्थित वसंतराव नाईक नगर नं. २ येथे २७ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली होती. याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात जावयाच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक करण्यात आली होती. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती.
घटना क्रमांक २
अमरावती पोलीस आयुक्तालयातील बडनेरा शहरात एका युवतीवर सामूहिक अत्याचार झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. ३० वर्षीय युवतीला रोजगाराचे आमिष दाखवून भेटायला बोलावले आणि चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची ती संतापजनक घटना सप्टेंबर २०२० मध्ये उघड झाली होती. बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवारात ही घटना घडली होती. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी चार नराधमांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.
घटना क्रमांक ३
खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकटेश कॉलनीमध्ये २१ वर्षीय तरुणीने आपल्याच सख्ख्या लहान भावाची बत्त्याने हत्या केली होती. जुलै २०२० मध्ये ही खळबळजनक घटना घडली होती. आपल्या १० वर्षीय भावाचा खून केल्यानंतर ती परागंदा झाली. मात्र, पुढे तिने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते.