लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील राहुलनगर परिसरातील भाड्याच्या खोलीत मृतावस्थेत आढळलेल्या महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून मृताचा लिव्ह इन पार्टनर सुभाष अजाबराव वानखडे (४०, रा. नेरपिंगळाई, मोर्शी, ह. मु. राहुलनगर) याच्याविरुद्ध खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला.
कविता सुभाष वानखडे उर्फ कविता नागेश पिल्लारे (४५, रा. राहुलनगर, अमरावती) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कविता यांचा भाऊ रितेश रमेश ठाकरे (३७, रा. मेटीखेडा, ता. कळंब, जि. यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून २७ सप्टेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास एफआयआर नोंदविला. सुभाष वानखडे याच्यासोबत 'लिव्ह इन...'मध्ये राहणाऱ्या कविता यांचा मृतदेह त्या राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास आढळून आला होता. त्या महिलेचा मृत्यू असॉल्ट अर्थात हल्ल्यातून झाला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष शवविच्छेदन अहवालातून काढण्यात आला होता.
दरम्यान, शुक्रवारी शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांकडे देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंतिम संस्कार पार पडले. त्यानंतर शनिवारी मृताच्या भावाने फ्रेजरपुरा पोलिस ठाणे गाठून सुभाष वानखडेविरुद्ध तक्रार नोंदविली. सुभाष वानखडे हा घटनेपासून फरार आहे.
फ्रेजरपुरा पोलिसांकडून शोध सुरू
फ्रेजरपुरा पोलिसांनी संशयित आरोपी सुभाषचा कसून शोध चालविला आहे. त्याचा मोबाईल बंद आहे. मात्र तरीही डीबीसह अन्य पथकेही त्याच्या मागावर असल्याची माहिती ठाणेदार रोशन सिरसाट यांनी दिली.
त्यांच्यात होत होते वाद
आपण काकासह राहुलनगर येथे आलो असतो, कविता व सुभाष वानखडे हे पती-पत्नी म्हणून सोबत राहत होते. त्यांच्यात नेहमी वाद होत होता. जेव्हा कविता ही भाड्याच्या खोलीत मरण पावली, तेव्हा दरवाजा बाहेरून लावलेला होता. सुभाष वानखडे हा तेव्हापासून त्या भाड्याच्या खोलीकडे फिरकला नाही, असे रितेश ठाकरे यांना समजले. सबब, त्यांनी सुभाष वानखडेवर संशय व्यक्त करणारी तक्रार दाखल केली.
तळेगाव दशासरमध्ये होती मिसिंगची तक्रार
तक्रारीनुसार, कविता यांचे नागेश पिल्लारे (रा. तळेगाव दशासर) यांच्यासोबत लग्न झाले होते. २७ जून रोजी कविता या घरून निघून गेल्या. याबाबत नागेश यांनी तळेगाव दशासर पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती. त्यानंतर कविता यांनी सुभाषसह पोलिस ठाणे गाठले. ती सुभाषसोबतच निघून गेली होती. त्यावेळीपासून बहिण भावात संवाद झाला नाही. त्यानंतर २५ रोजी दुपारी नागेश यांनी कविता हिच्या मृत्यूबाबत रितेश ठाकरे यांना माहिती दिली.
Web Summary : Amravati woman found dead; live-in partner suspected of murder. She left her husband. Police investigate, partner missing. Family suspects foul play.
Web Summary : अमरावती में महिला मृत मिली; लिव-इन पार्टनर पर हत्या का शक। उसने पति को छोड़ा। पुलिस जांच कर रही है, पार्टनर लापता। परिवार को गड़बड़ का संदेह।