‘बाई मी लाडाची, कैरी पाडाची...’
By Admin | Updated: February 28, 2017 00:14 IST2017-02-28T00:14:56+5:302017-02-28T00:14:56+5:30
‘या रावजी तुम्ही बसा भाऊजी’ या अस्सल मराठमोळ्या लावणीने सुरूवात झालेल्या चिखलदरा पर्यटन महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित ...

‘बाई मी लाडाची, कैरी पाडाची...’
अस्सल मराठमोळी लावणी : पर्यटकांसह स्थानिक नागरिकही थिरकले
चिखलदरा : ‘या रावजी तुम्ही बसा भाऊजी’ या अस्सल मराठमोळ्या लावणीने सुरूवात झालेल्या चिखलदरा पर्यटन महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित पर्यटक, पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह स्थानिकांनी जागेवरच थिरकत मनसोक्त आनंद लुटला.
शनिवारपासून सुरू झालेल्या चिखलदरा पर्यटन महोत्सवात दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल आहे. रविवारी आणि सोमवारी सलग दोन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत मराठमोळ्या अस्सल लावणींचा कार्यक्रम असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटकांसह नागरिकांची उपस्थिती होती.
ऐन परीक्षेच्या कालावधीमध्ये सुरू झालेल्या चिखलदरा पर्यटन महोत्सवाला मुंबई-पुण्यासह मध्यप्रदेशच्या पर्यटकांनी पाठ फिरविली. मात्र रात्रीला आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला अमरावती, अकोला जिल्ह्यातील पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली व अस्सल मराठमोठ्या लावणीचा आनंद लुटला. शनिवार, रविवारीदेखील कार्यक्रमाला मोठी गर्दी होती. (तालुका प्रतिनिधी)
लावणीच्या दोन्ही कार्यक्रमांना उत्स्फूर्त गर्दी
महाराष्ट्राची शान असलेल्या अस्सल मराठमोळ्या लावण्यांचे शनिवारी प्रियंका शेट्टी आणि पथकाने, तर सोमवारी कीर्ती आवळे यांच्या पथकाने बहारदार सादरीकरण केले. या लावण्यांमध्ये बाई वाड्यावर या, खंडेरायाच्या लग्नाला, नवरी नटली, सैराट झालं जी पासून तर बाई मी लाडाची, लाडाची कैरी पाडाची यासह मला जाऊ द्या ना घरी, यासारख्या दिलखेच लावण्यांवर पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटला.