ट्रक हलविल्यानंतर काही तासांतच परिस्थिती जैसे-थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:02 IST2017-08-12T23:01:28+5:302017-08-12T23:02:06+5:30

ट्रक हलविल्यानंतर काही तासांतच परिस्थिती जैसे-थे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मुख्य मार्गावर अवैधरीत्या शेकडो ट्रकची पार्किंग करण्यात येते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. परिणामी अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या आदेशाने पोलिसांनी या परिसरातील ट्रक हटविण्यात आले होते. सदर कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली होती. परंतु काही तासांतच जैसे थे परिस्थिती झाल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता राजरोसपणे ट्रकची पार्किंग केली जात आहे.
'लोकमत'ने काही दिवसांपूर्वीच हा प्रश्न लोकदरबारात मांडला होता. त्यामुळे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी या मुद्यावर चर्चा करून रस्त्यावरील उभे राहणारे ट्रक या ठिकाणीवरून काढण्याचे आदेश पोलिसांना व संबंधित यंत्रणेला दिले होते.
त्याअनुषंगाने शुक्रवारी पोलिसांच्या ताफ्यासह या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. पण शनिवारी सकाळी सदर ट्रक पुन्हा रस्त्यावर उभे करण्यात आले होते. त्यामुळे ट्रान्सपोर्टनगरातील विविध ट्रान्सपोर्ट संचालकांवर कारवाईचा बडगा का उगारू नये, असा प्रश्न विचारला जात आहे. ट्रान्सपोर्टनगर पासून वलगावला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर हजारो वाहनांची रोज ये-जा सुरू असते. परंतु अनेक प्रभागांतून दुचाकीस्वार मुख्य रस्त्यावर येतात. तेव्हा ट्रक या ठिकाणी उभे करून अतिक्रमण केले जात असल्याने वाहनचालकांना समोेरच्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे रोजच किरकोळ अपघात होत आहेत. मोठा अपघात होण्याची शक्यता असून अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, हा प्रश्नही पुढे येत आहे.