झोपडपट्टीमुक्त शहराचे स्वप्न पूर्ण करणार
By Admin | Updated: December 6, 2014 22:38 IST2014-12-06T22:38:06+5:302014-12-06T22:38:06+5:30
राज्यात सर्वाधिक घोषित झोपडपट्ट्या अमरावती शहरात असून या झोपड्यांच्या जागी घरकुलांची निर्मिती केली जाईल. कच्च्या, कुडा -मातीच्या घरांचे रुपांतर पक्क्या घरांमध्ये करुन शहराचे चित्र बदलवून टाकणार,

झोपडपट्टीमुक्त शहराचे स्वप्न पूर्ण करणार
मुलाखत: नवनियुक्त राज्यमंत्र्यांची ग्वाही
अमरावती : राज्यात सर्वाधिक घोषित झोपडपट्ट्या अमरावती शहरात असून या झोपड्यांच्या जागी घरकुलांची निर्मिती केली जाईल. कच्च्या, कुडा -मातीच्या घरांचे रुपांतर पक्क्या घरांमध्ये करुन शहराचे चित्र बदलवून टाकणार, अशी ग्वाही राज्याचे उद्योग, खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवनियुक्त राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी येथे दिली.
शुक्रवारी मुंबईत राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ना.पोटे शनिवारी शहरात आले. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’ सोबत संवाद साधला. ना. पोटे यांच्या मते, त्यांची मंत्रीपदासाठी निवड गुणवत्तेच्या आधारे करण्यात आली आहे. जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्यासोबतच भाजपच्या बांधणीसाठी जोमाने काम करणार, असेही ते म्हणाले. ज्येष्ठ नेते अरुण अडसड, आ. प्रकाश भारसाकळे, तुषार भारतीय, आ. सुनील देशमुख आदींच्या सहकार्याने भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष कसा होईल, यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान हा व्यक्तीला नव्हे तर त्याच्या पदाला मिळतो. त्यामुुळे आपल्याला जे काही मिळाले ते भाजपने दिले असून भविष्यात भाजपच्या बांधणीसाठी झोकून देऊ, असेही ते म्हणाले. घरकुलाचे प्रत्येकांचे स्वप्न असते. घरकुल योजनेतून ते पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध राहू, असे ना.पोटे म्हणाले.