‘रिलेशनशिप’ पार्टनरकडून पत्नीला मारहाण; पतीने नोंदविला एफआयआर!

By प्रदीप भाकरे | Updated: June 5, 2023 16:28 IST2023-06-05T16:28:32+5:302023-06-05T16:28:57+5:30

शहर कोतवाली हद्दीतील घटना : डायल ११२ ला पाचारण

Wife Beating by 'Relationship' Partner; FIR registered by the husband! | ‘रिलेशनशिप’ पार्टनरकडून पत्नीला मारहाण; पतीने नोंदविला एफआयआर!

‘रिलेशनशिप’ पार्टनरकडून पत्नीला मारहाण; पतीने नोंदविला एफआयआर!

अमरावती : आपल्या पत्नीला तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या मित्राने बेदम मारहाण केल्याची तक्रार एका पतीने नोंदविली आहे. ४ जून रोजी पहाटे ३ च्या सुमारास साईनगर ते अंबापेठ प्रवासादरम्यान ऑटोरिक्षामध्ये ही घटना घडली. याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी आरोपी आसिफ खान मेहताब खान (४०, रा. हैदरपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. फिर्यादीने डायल ११२ ला कॉल करून पोलिसांची मदत मागितली होती.

फिर्यादी व्यक्तीची पत्नी सामाजिक कार्यकर्ता आहे. आरोपी हा तिच्या ओळखीचा आहे. तिचे व आरोपीचे घनिष्ट संबंध असून, ते रिलेशनशिपमध्येदेखील आहेत. दरम्यान, सात ते आठ महिन्यांपासून आरोपी आसिफ खान हा जबरदस्ती फिर्यादी व्यक्तीच्या घरात घुसून त्याच्या पत्नीला शिवीगाळ व मारहाण करीत असतो. महिनाभरापूर्वी आरोपीने फिर्यादीच्या घराचे दार तोडून आत प्रवेश केला. घरातील साहित्याची तोडफोड केली. त्यावेळी फिर्यादीने आरोपीस समजावण्याचा प्रयत्न केला. आसिफ उलटपक्षी त्यालाच जिवाने मारण्याच्या धमकी दिल्या.

असे घडले मारहाण नाट्य

४ जून रोजी रात्री १ च्या सुमारास फिर्यादी हे पत्नीसह साईनगरजवळ असताना आसिफ खानचा त्यांच्या पत्नीला कॉल आला. त्यानंतर दहा मिनिटात तो तेथे पोहोचला. त्याने फिर्यादीची माफी मागितली. त्यानंतर तिघेही एका हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेले. परतताना फिर्यादी हे एकटेच दुचाकीने घराकडे निघाले, तर आरोपी हा त्या महिलेला घेऊन ऑटोरिक्षाने निघाला. ती रात्री ३ च्या सुमारास घरी पोहोचली. घरी पोहोचल्यावर आरोपी आसिफ खान याने आपल्याला ऑटोत मारहाण केली तथा तो शिवीगाळदेखील करत होता, अशी तक्रार पतीकडे केली. त्यावेळी फिर्यादीने डायल ११२ वर कॉल करून मदत मागितली. त्यानंतर ते दाम्पत्य कोतवालीत तक्रारीसाठी पोहोचले.

Web Title: Wife Beating by 'Relationship' Partner; FIR registered by the husband!