शिक्षकांचेच पगार उशिरा का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST2021-05-19T04:13:25+5:302021-05-19T04:13:25+5:30
जिल्ह्यातील शिक्षकांना दोन महिन्यांच्या वेतनाची प्रतिक्षा अमरावती : काही महिन्यांपासून जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार वेळेवर झालेले नाहीत. जिल्हा परिषद ...

शिक्षकांचेच पगार उशिरा का ?
जिल्ह्यातील शिक्षकांना दोन महिन्यांच्या वेतनाची प्रतिक्षा
अमरावती : काही महिन्यांपासून जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार वेळेवर झालेले नाहीत. जिल्हा परिषद शिक्षकांचा पगार वेळेवर न झाल्याने शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या या कठीण प्रसंगी शिक्षकांना दोन महिन्यांपासून वेतनाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शिक्षकांचेच पगार उशिरा का, असा प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेकडून ऑफलाईन पद्धतीने शिक्षकांचे पगार केले जातात. मात्र, यातही अडचणी उद्भवत असल्याने त्यांना वेळेवर पगार मिळत नाही. शिक्षकांचे पगार हे सीएमपी किंवा ईसीएस या ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे. मात्र, ही कार्यवाही रखडल्याने जुन्या पद्धतीने पगार केले जात आहेत. दरमहा १ तारखेला व ऑनलाईन पगार करण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून शिक्षक संघटनांची आहे.
बॉक्स
महिन्याच्या १२ ते १५ तारखेला मिळते वेतन
महिन्याच्या १ तारखेला शिक्षकांचा पगार करण्याची मागणी असतानाही वेळेवर पगार होत नाहीत. जिल्ह्यातील शिक्षकांना १२ ते १५ तारखेला पगार मिळतो. मात्र, सध्या मार्च महिन्यापासून पगारच मिळाला नसल्याची माहिती शिक्षकांनी दिली. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत.
बॉक्स
जिल्ह्यातील जि.प. शाळा - १५८३
एकूण शिक्षक - ५९३२
बाॅक्स
वेळेवर पगाराचा प्रश्न कायमचाच !
शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार मे महिन्याची १७ तारीख लोटली तरी झालेले नाहीत. कोविडच्या पार्श्वभूमीवर पगार उशिरा होत आहेत. मात्र, याचा फटका जिल्हा परिषद शिक्षकांना बसत आहे. वेळेवर पगार करण्याची मागणी कोरोनाच्या आधीपासून प्रलंबित आहे.
बॉक़्स
घराचे हप्ते वेळेवर कसे फेडणार ?
कोट
शालार्थ प्रणाली नावापुरती उरली असून, शिक्षकांचे वेतन ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. त्यामुळे राज्यस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागते. त्यामुळे शालार्थ प्रणाली सक्षम करून सीएमपी प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन आवश्यक आहे. शालार्थ प्रणालीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील डीडीओची जबाबदारी मुख्याध्यापकांकडून काढून बीईओंकडे देण्यात यावी.
- किरण पाटील, राज्य उपाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ.
कोट
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन करणारी विद्यमान पद्धती ही अत्यंत वेळखाऊ आणि कालबाह्य असल्यामुळे शिक्षकांना कधीही वेळेवर वेतन मिळत नाही. एक तारखेला वेतन मिळण्यासाठी सीएमपी प्रणालीचा वापर करण्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला आहे. आता तरी प्रशासनाने शिक्षकांचे वेतनाकरिता सीएमपी प्रणालीची अंमलबजावणी तातडीने केली पाहिजे.
- मंगेश खेरडे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती (प्राथमिक)
कोट
दरमहा वेतन उशिरा होत असल्यामुळे शिक्षकांनी घरासाठी घेतलेल्या कर्जावर अतिरिक्त व्याज चढते. प्रत्येक महिन्याला व्याजाचा भुर्दंड बसतो. पगार दरमहा वेळेवरच देण्यात यावा.
- राजेश सावरकर, राज्य प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती