मुली का म्हणतात, 'शेतकरी नवरा नको गं बाई'? बेभरवशाच्या शेती की कारण अजून काही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:02 IST2025-02-28T12:01:49+5:302025-02-28T12:02:20+5:30
Amravati : सामाजिक जागृती होण्याची गरज असल्याचे पित्यांनी मत वधू-वर व्यक्त केले

Why do girls say, 'Don't want a farmer husband? Reckless agriculture or something else?
सतीश बहुरूपी
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा बाजार : शेती हा बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. शेतीत उत्पन्नाची हमी राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी नवरा नकोच, अशी धारणा होऊ लागल्याने शेती करणाऱ्या वराला आता नवरी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. तथापि, एकीकडे 'शेतकरी नवरा नको गं बाई' म्हणणाऱ्या वधूला व वधूच्या नातेवाइकांना नोकरीवर असलेल्या मुलाकडे शेती पाहिजे. हा खटाटोप कशाला, असा प्रश्न उपस्थित सामान्य नागरिक विचारत आहेत.
पूर्वीचा काळ बघितला, तर उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा समज होता. कालांतराने चक्र बदलले. नोकरी उत्तम, तर शेती ही कनिष्ठ ठरली. या दहा वर्षांच्या काळात शेतीतून उत्पन्न खर्चाच्या तुलनेत बरेच कमी झाले आहे.
उत्पन्न जरी सरासरीएवढेच होत असेल तरी मिळणारा बाजारभाव व लागवड खर्च यांचा ताळमेळ जुळत नसल्याने मिळणारा नफा हा फारच कमी असून, बरेचदा शेती तोट्यातही जाते. दुसरीकडे जन्मदर तफावत, शेतीबद्दल शासनाची अनास्था, मुलींचे उच्च शिक्षण आदी बाबीदेखील 'शेतकरी नवरा नको गं बाई' म्हणण्यास कारणीभूत ठरत आहेत. याबाबत सामाजिक जागृती होण्याची गरज असल्याचे मत वधू-वर पित्यांनी व्यक्त केले.
ही आहेत कारणे
- शेतकरी कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींनाही शहरात नोकरी करणारा नवरा हवा आहे.
- मुंबई, पुणे यांसारख्या शहरात नोकरी असलेला तसेच स्वतंत्र फ्लॅट असलेल्या मुलाला प्राधान्य, तर शेतात राबणारा मुलगा नकोसा झाला आहे.
- शेतकरी मुलाला मुलगी दिल्यास मुलगी सुखात राहणार नाही, उन्हातान्हात शेतीची कामे करावी लागतील, या काळजीने पालकही मुलगी द्यायला तयार होत नाहीत.
- नोकरी करणाऱ्या मुलाकडे शेती आहे की नाही, याच माहिती आवर्जून विचारली जाते. प्रत्यक्षात शेतीळा दुय्यम ठरवून नोकरीलाच प्राधान्य दिल्या जाते.