लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील अनेक बायोमेट्रिक हजेरी नसलेल्या शासकीय कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांना रजिस्टरवच हजेरी नोंदवावी लागत आहे. यामुळे कर्मचारी कार्यालयात किती वाजता हजर झाले आणि किती वाजता गेले याबाबतचा लेखाजोखा ऑनलाइन दिसत नाही. यामुळे या शासकीय कर्मचाऱ्यांचे चांगले होत असल्याचे चित्र बायोमेट्रिक हजेरी नसलेल्या विविध शासकीय कार्यालयांत दिसून येत आहे.
जिल्हा व तालुका मुख्यालयी असलेल्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या मुख्य लेखा व वित्त विभाग, समाजकल्याण विभाग, याशिवाय बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचे उपविभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग माध्यमिक, तसेच पंचायत समिती अमरावती, पंचायत समिती भातकुली याशिवाय जिल्हा उद्योग केंद्र अशा अनेक शासकीय कार्यालयांत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हजेरी-गैरहजेरी नोंदविण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केलेली नाही. त्यामुळे या सर्व विभागांतील कार्यरत कर्मचारी नेमके किती वाजता कर्तव्यावर हजर होतात आणि केव्हा जातात याचा ऑनलाइन डेटा ठेवला जात नाही. परिणामी सदर विभागातील कर्मचारी हे आजही रजिस्टवरच आपल्या कर्तव्यावरील कामाची हजेरी नोंदवीत आहेत.
वेळेवर येणारे कमीचविविध सरकारी कार्यालयांत सकाळी निवांत येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेकजण फिरतीची कारणे सांगून गायब असतात. भटकंती करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बायोमेट्रिक यंत्रणा बसविणे आवश्यक आहे.
येथे रजिष्टरवरच हजेरी...
- जिल्हा परिषदेत बहुतांश विभागांत हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणालीचा अवलंब होत असला तरी वित्त विभाग, आरोग्य विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग, बांधकाम, पाणीपुरवठा विभागाचे उपविभागात रजिस्टवरच हजेरी नोंदविली जाते.
- जिल्हाभरातील आरोग्य केंद्रांमध्येही बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बसविलेली नाही. आता ती बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.
- जिल्हा उद्योग केंद्रात कार्यरत 3 असलेल्या कर्मचाऱ्यांची हजेरी सध्याही रजिस्टरमध्ये नोंदविली जात आहे. या विभागात अद्यापपर्यंत तरी बायोमेट्रिक यंत्रणा सुरू केलेली नाही.
कार्यालय प्रमुख म्हणतात..."जिल्हा उद्योग केंद्रात बायोमेट्रिक कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविण्यासाठी यंत्रणा नाही. मात्र, या विभागातील कर्मचारी हे कार्यालयीन वेळेवर हजर होतात आणि वेळेवर जातात. वेळप्रसंगी जादा कामे असल्याचे उशिरापर्यंत कामेही करतात."- अमोल निकम, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र
"जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात ज्या विभागात कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केलेली नाही अशा विभागाच्या प्रमुखांना बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याबाबत सूचना दिल्या जातील."- बालासाहेब बायस, डेप्युटी सीईओ, जीएडी