इवल्या इवल्या पक्ष्यांच्या वेदना रोखणार कोण?
By Admin | Updated: July 14, 2016 00:16 IST2016-07-14T00:16:05+5:302016-07-14T00:16:05+5:30
घराची शोभा वाढविण्यासाठी पक्ष्यांना कैद करून पालनपोषण करण्याची पध्दत अमरावतीत मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

इवल्या इवल्या पक्ष्यांच्या वेदना रोखणार कोण?
नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच नाही : शहरात सर्रासपणे विदेशी पक्ष्यांची विक्री, बहुतांश घरी पोपट
वैभव बाबरेकर अमरावती
घराची शोभा वाढविण्यासाठी पक्ष्यांना कैद करून पालनपोषण करण्याची पध्दत अमरावतीत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या देशी-विदेशी पक्षांची शहरात सर्रास विक्री होत आहे. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच शहरात नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या इवल्याशा मुक्या जिवांच्या वेदना कधी संपणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गगणात भरारी घेणारे हे पक्षी घराची शोभा वाढविण्यासाठी बंदीस्त केले जातात. शहरातील अनेक घरांमध्ये पिंजऱ्यात कैद असलेले विविध प्रजातीचे पक्षी आढळून येत आहे. या विदेशी पक्ष्यांची विक्री करण्याची परवानगी कोण देते, याबाबत वनविभाग सुध्दा अनभिज्ञ आहे. त्यामुळे पक्षी विक्रेते बिनधास्तपणे शहरात पक्ष्यांची विक्री करीत आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावर पक्षी संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जाते. भारतीय वन्यजीव कायद्यानुसार काही पक्षी प्रजातीची विक्री करण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. त्याशिवाय कोणत्याही प्रजातीच्या पक्षांची विक्री करता येत नाही. मात्र, शहरातील काही ठिकाणी सर्रासपणे पक्ष्यांची विक्री होत आहे. पक्षी विक्रीसंदर्भात संबधित विक्रेत्यांची चौकशी करण्याचे अधिकारी वनविभागाकडे आहेत. मात्र, तरीसुध्दा या विक्रेत्यांकडे पक्षी विक्रीसंदर्भात काही दस्ताऐवज आहे किंवा नाही, याची शहानिशासुध्दा वनविभाग करीत नाही. या आकर्षक पक्षांची खुलेआम विक्री होत असल्यामुळे नागरिकांनीही पक्षी खरेदीची ओढ लागली आहे. त्याचप्रमाणे वन्यजीव सरंक्षण कायद्याच्या अनुसूची यादीत असलेला पोपट हा पक्षी बहुतांश नागरिकांच्या घरातील पिंजऱ्यात आढळून येतात. मात्र, आजपर्यंत या पक्षाविषयी एकही कारवाई वनविभागाने केली नाही. या इवल्याशा जीवांंना बंदीस्त करून त्यांची हेडसांड केली जाते. काही प्रसंगी नागरिक या पक्षांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष सुध्दा करतात. अनेकदा बंदीस्त असलेले हे पक्षी पिंजऱ्यातच मृत्यूमुखी पडतात. अनेक जण बाहेरगावी जातात, अशावेळी पक्षांची काळजी घेणारे घरात कोणीच राहत नाही. अशाप्रसंगी अन्न-पाण्याविना हे पक्षी दगावतात. शहरात सर्रारपणे हा प्रकार घडत आहे. मात्र, याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत आहे.
पक्षीप्रेमी म्हणतात
स्थानिक पक्षी प्रजातीला धोका
शहरात देश-विदेशातील पक्ष्यांची विक्री होत असल्यामुळे हे स्थानिक प्रजातीला धोकादायक ठरू शकते, असे मत पक्षी अभ्यासकांचे आहे. एखाद्या पक्षी प्रजातीच्या आजार स्थानिक पक्षांना संसर्ग करू शकतो, तसेच एखाद्या पक्ष्यांची संख्या वाढल्यास स्थानिक प्रजातीच्या पक्षाच्या अधिवासाला धोका निर्माण होऊ शकतो, असे पक्षीप्रेमी व अभ्यासकांचे मत आहे.
वनविभागाने केले हातवर
लवबर्ड, क्राकटील पॅराट व पिन्चेस या पक्ष्यांची शहरात सर्रास विक्री होत आहे, यासंदर्भात 'लोकमत'ने वनविभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता हे पक्षी वन्यजीव सरंक्षण कायद्याच्या अनुसूची यादीत येत नसल्याचे सांगून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हात वर केले.
घरोघरी पिंजऱ्यात पोपट
भारतीय वन्यजीव सरंक्षण अधिनियम १९७२ अतंर्गत अनुसूची १ व २ मध्ये येणारा पोपट हा पक्षी सहजरित्या नागरिकांच्या घरातील पिंजऱ्यात आढळून येतो. वास्तविक पाहता पोपटला पिंजऱ्यात कैद करून ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे. याकडे वनविभागाने पुर्णत: दुर्लक्ष केले आहे. बहुतांश नागरिक पोपट पाळतात. मात्र, आजपर्यंत कोणावरही कारवाई का करण्यात आली नाही, हे विशेष.
मग, कारवाईचे अधिकार कोणाला
हे पक्षी भारतीय वन्यजीव कायद्याच्या अनुसूची यादीत नाही, त्यामुळे या पक्षांच्या विक्रीसंदर्भात वनविभाग कारवाई करू शकत नाही, असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. तर यासंदर्भात कारवाईचे अधिकार कोणाला ?