सार्वजनिक समस्या सोडविणार कोण?

By Admin | Updated: August 2, 2015 00:33 IST2015-08-02T00:33:43+5:302015-08-02T00:33:43+5:30

साठ हजार लोक वस्तीचे शहर आणि दीड लाख लोक वस्तीचा ग्रामीण भाग असा दोन लाखांच्याही वर लोक संख्येचा भार वाहणारा अंजनगाव सुर्जी ...

Who will solve the public problem? | सार्वजनिक समस्या सोडविणार कोण?

सार्वजनिक समस्या सोडविणार कोण?

लोकप्रतिनिधींची अनास्था : धुळीस मिळाले साखर कारखान्याचे स्वप्न
अंजनगाव सुर्जी : साठ हजार लोक वस्तीचे शहर आणि दीड लाख लोक वस्तीचा ग्रामीण भाग असा दोन लाखांच्याही वर लोक संख्येचा भार वाहणारा अंजनगाव सुर्जी तालुका अजूनही सार्वजनिक समस्यांच्या समाधानासाठी योग्य नेत्याची वाट पाहत आहे.
अकोट, दर्यापूर व परतवाडा या तीनही शहरांच्या मध्यभागी तीस किलोमीटरच्या समान अंतरावर असलेले अंजनगाव सुर्जी आजही एसटी आगारापासून वंचित आहे. दररोज शंभरच्यावर बसफेऱ्या येथून लांब पल्ल्याच्या गावांपर्यंत जातात. अमरावती व अकोला मार्गावर भारी वाहतूक असून एसटीसोबतच खासगी प्रवासी वाहनेसुध्दा प्रवाशांनी खचून भरलेली असतात. खेडे पाड्यातून शिकण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना एसटी पासेससाठी ताटकळावे लागते. प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंंबून रहावे लागते. घरी लग्न समारंभ असला तर विनाकारण आजूबाजूच्या डेपोचे जाण्यायेण्याचे साठ किलोमिटरचे एसटीचे भाडे भरावे लागते. पन्नास वर्षे उलटूनसुध्दा एकाही आमदाराला ही समस्या सोडविता आली नाही.
अंबादेवी साखर कारखान्याचे स्वप्न आता माती मोल झाले आहे. काळी कसदार शेती, सिंचनाच्या सोयी व उसाचे भरघोस उत्पन्नाची हमी असलेल्या तालुक्यात मोठ्या थाटामाटाने उभारलेला अंबा साखर कारखाना राजकीय हेवेदाव्यांमुळे कायमचा बुडाला आहेत. ज्या शिखर बँकेने हा कारखाना अवसायनात काढून विकला त्या घेणाऱ्या कंपनीचे नाव आणि कार्यालय रहस्यमय आहे आणि दिलेल्या मुंबईच्या पत्त्यावर कंपनीचे कार्यालय बेपत्ता आहे.
येथील ग्रामीण रुग्णालय स्थापनेपासूनच समस्याग्रस्त असून केवळ तीस खाटांच्या भरवश्यावर आणि अपुऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आधारे आपले दिवस काढत आहेत. गावाच्या परिसरात एखादा मोठा अपघात झाला किंवा कुणी व्यक्ती गंभीर जखमी झाला तर त्याला येथे कोणत्याच सुविधा नाहीत. जिल्ह्याचे ठिकाणी नेताना अनेक गंभीर व्यक्ती रस्त्यातच दगावल्या आहेत. मृत महिलांच्या शव विच्छेदनासाठी अथवा महिला वर्गाच्या शस्त्रक्रियेसाठी येथे महिला डॉक्टर उपलब्ध नसून वेळप्रसंगी खासगी महिला डॉक्टराला अथवा आजुबाजूच्या तालुक्यातून महिला डॉक्टरला बोलवावे लागते. उपजिल्हा रुग्णालयासाठी येथील ग्रामीण रुग्णालय आतुरतेने प्रतीक्षेत आहे.

Web Title: Who will solve the public problem?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.