नवा अध्यक्ष कोण? जिल्हा परिषदेत एकच चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST2019-11-23T06:00:00+5:302019-11-23T06:00:59+5:30
राजकीय मंडळीच नव्हे, तर अधिकाऱ्यांपासून कर्मचाºयापर्यंत सर्वांमध्ये एकच चर्चा होत आहे - कोणता सदस्य अध्यक्ष होणार? नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या गटातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या १६ आहे, तर सर्वसाधारण प्रवर्गात २० पैकी दोन जागा रिक्त असल्याने १८ सदस्य जिल्हा परिषद सभागृहात प्रतिनिधित्व करीत आहेत.

नवा अध्यक्ष कोण? जिल्हा परिषदेत एकच चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यावरून आता जिल्हा परिषदेत कोणता सदस्य अध्यक्ष होणार, याची चर्चा चवीने दिवसभर ‘मिनी मंत्रालया’त रंगत आहे. प्रत्येकाकडून आपआपल्या परीने नाव पुढे करून तेच अध्यक्ष होऊ शकतात, हे पटवूनदेखील दिले जात आहे.
राजकीय मंडळीच नव्हे, तर अधिकाऱ्यांपासून कर्मचाºयापर्यंत सर्वांमध्ये एकच चर्चा होत आहे - कोणता सदस्य अध्यक्ष होणार? नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या गटातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या १६ आहे, तर सर्वसाधारण प्रवर्गात २० पैकी दोन जागा रिक्त असल्याने १८ सदस्य जिल्हा परिषद सभागृहात प्रतिनिधित्व करीत आहेत.
विशेष म्हणजे, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील १६ सदस्य असून, यापैकी काही नावांवर एकमत सुद्धा होताना दिसत आहे, तर राजकीय नातेसंबंध, भविष्यातील राजकीय गणिते पाहून काही आपले मत व्यक्त करत आहेत. अद्याप या भागाला अध्यक्षपद मिळाले नाही म्हणून त्यांनाच अध्यक्षपद मिळेल, अशी चर्चाही जोर पकडत आहेत. कोणी आपला भाग कसा मोठा आणि प्रतिनिधित्व करणारा सदस्य राजकीयदृष्ट्या किती वजनदार आहे, याचीही महती जिल्हा परिषदेतील चर्चेदरम्यान रंगत आहे. त्याआधारे याच सदस्याला अध्यक्षपद मिळू शकते असेही सांगितले जात आहे. अशाप्रकारच्या चर्चा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होताच दररोज रंगत आहेत.
दरम्यान, अध्यक्षपदासाठी सत्ताधारी काँग्रेस व विरोधी पक्षात असलेल्या भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच सद्यस्थितीत पक्षश्रेष्ठी राज्यात सत्तास्थापनेसंदर्भात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील व्यक्तीकडे अथवा थेट फोनवर संपर्क करू न मोर्चेबांधणी केली जात आहे, तर काहींनी यापूर्वीच पक्षश्रेष्ठीकडे आपली बाजू मांडली असल्याचेदेखील सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषदेतील स्ट्राँग सदस्यांची भेट घेऊन अध्यक्षपदावर विराजमान करण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत यामध्ये कोण बाजी मारणार, हे स्पष्ट होणार आहे.