लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेहरू मैदानावर कोणतेही बांधकाम होणार नाही, ही बाब स्पष्ट केली आहे, तर आमदार खोडके यांनी पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार नेहरू मैदानाचा विकास होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे नेमकं खोटं कोण बोलतंय, पालकमंत्री की आमदार, याविषयी खुलासा करावा आणि पालकमंत्री बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेख करून जनतेची दिशाभूल केल्याबाबत भाजप खोडके दाम्पत्याकडून माफीनामा घेणार का, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी मंगळवारी पत्रपरिषदेतून उपस्थित केला.
नेहरू मैदानाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. देश, राज्य स्तरावरील अनेक नेत्यांच्या सभेचे हे मैदान साक्षीदार आहे. असे असताना या मैदानाचे जतन, संवर्धन करण्याऐवजी आमदार खोडके दाम्पत्य ते विकायला निघाले आहेत.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव असलेल्या या ऐतिहासिक मैदानाची जागा बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घालण्याचा हा घाट असल्याची टीका माजी महापौर मिलिंद चिमोटे, विलास इंगोले यांनी केली. अमरावती हे व्यापाऱ्यांचे शहर होते, आता शहराचा व्यापार होत आहे. तथापि हे षडयंत्र काँग्रेस हाणून पाडेल, असा इशारा शहराध्यक्ष बबलु शेखावत यांनी दिला. तसेच ३ वर्षांपासून बंद असलेले टॉऊन हॉल सुरू करावे, यासाठी काँग्रेसने निवेदन देत आंदोलन केले, याची आठवण शेखावत यांनी करून दिली. नेहरू मैदान असो वा टाऊन हॉल त्याची दुरूस्ती, संवर्धन करण्याऐवजी लोकप्रतिनिधीकडून ते उपेक्षित ठेवायचे आणि नंतर पाडायचे. कालांतराने बिल्डर्सना द्यायचे, असा सगळा प्रचंच सुरू असल्याची टीका मिलिंद चिमोटे यांनी केली.
पत्रपरिषदेला माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, अशोक डोंगरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी सभापती बाळासाहेब भुयार, मुन्ना राठोड, किशोर बोरकर, काँग्रेसच्या महिलाध्यक्ष जयश्री वानखडे, समीर जवंजाळ, आसिफ तवक्कल आदी उपस्थित होते.
नेहरू मैदानावरील कचरा तत्काळ हटवा : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मंगळवारी नेहरू मैदानातील कचरा ४८ तासांच्या आत उचलण्याचे निर्देश दिलेत. शिट नंबर ५५ ए, प्लॉट नंबर १/१ या १३ हजार ६२७.८१ चौ.मी. क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे त्यांनी आदेशात नमूद केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या कचऱ्यामुळे प्रदूषण होत असल्याचे कळविल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या कलम ३० नुसार नेहरू मैदानावरील कचरा त्वरित उचलण्याचे निर्देश दिले आहेत. निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता मोहीम राबवावी, असेही निर्देश आहेत.
एवढी घाई कशाला?
नेहरू मैदानाची मालकी महापालिकेकडे आहे. आता प्रशासक असल्यामुळे आयुक्तांना तात्पुरते अधिकार दिले आहेत. मैदाने, ऐतिहासिक वास्तू देता येत नाहीत. महिने, दोन महिने थांबा. सर्वसाधारण सभा गठित झाली की, जनतेचे प्रतिनिधी निर्णय घेतील. एवढी घाई कशाला, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला. शहरात शिक्षण, आरोग्य, स्वच्छतेचे प्रश्न कायम असताना आमदार खोडकेद्वयाची अॅकेडमीक हायस्कूलच्या जागेबाबत हीच बिल्डरधार्जिणी भूमिका असल्याचा काँग्रेसने ठपका ठेवला आहे.
विरोधाला विरोध हाच खोडके दाम्पत्याचा एकसूत्री कार्यक्रम : राणा
महापालिकेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीत नेहरु मैदानाच्या जागेवर महापालिकेची प्रशासकीय ईमारत उभारण्याचाविषय झालाच नाही. मी स्वतः बैठकीत हजर होतो. परंतु, खोटं सांगून जनतेची दिशाभूल करणे, हा खोडके दाम्पत्यांचा एकसूत्री कार्यक्रम आहे, असा घणाघात आमदार रवी राणा यांनी केला. खरे तर महापलिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. याविषयी पीएमसीदेखील नेमली आहे. असे असताना अशावेळी चुकीची माहिती देऊन पालकमंत्र्यांना बदनाम करणे योग्य नाही, असे आमदार राणा यांनी सांगितले. एकीकडे महापालिका आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) या अतिशय उत्तम काम करीत असताना खोडके दाम्पत्यांकडून आयुक्तांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न होत आहे. एका चांगल्या अधिकाऱ्याच्या कामात खोडा आणलाजात आहे. असे असले तरी पालकमंत्री आणि मी महापालिका प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. यापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेविषयी असाच विरोधाचा कारभार खोडके दाम्पत्याने केला होता, असेही आमदार रवी राणा म्हणाले.
...तर महापालिकेसाठी विशेष अनुदान आणा
महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे. कंत्राटदार, पुरवठादारांची देयके थकीत आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनाची बोंबाबोंब असताना अमरावती शहराचे आमदार म्हणून खोडके दाम्पत्यांनी राज्य सरकारकडून महापालिकेसाठी विशेष अनुदान आणावे, असे काँग्रेसच्या नेते म्हणाले. काहीही झाले तरी नेहरू मैदानाचे वैभव, वारसा कायम ठेवण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेईल. प्रसंगी जन आंदोलन उभारले जाईल, असा निर्वाणीचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी दिला.
Web Summary : Controversy erupts over Nehru Maidan's development. Congress questions conflicting statements from the minister and MLA regarding construction plans. The historical significance of the ground is highlighted, with concerns raised about commercialization and neglect of public spaces.
Web Summary : नेहरू मैदान के विकास पर विवाद। कांग्रेस ने निर्माण योजनाओं के बारे में मंत्री और विधायक के विरोधाभासी बयानों पर सवाल उठाए। मैदान के ऐतिहासिक महत्व पर प्रकाश डाला गया, व्यावसायीकरण और सार्वजनिक स्थानों की उपेक्षा पर चिंता जताई गई।