अचलपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नेमके कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:11 AM2021-05-01T04:11:43+5:302021-05-01T04:11:43+5:30

अनिल कडू परतवाडा : काही महिन्यांपासून अचलपूर नगरपालिकेला पूर्णवेळ नियमित मुख्याधिकारी नाही. दरम्यान प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या संगीत खुर्चीने नागरिक व ...

Who exactly is the Chief Minister of Achalpur Municipal Council? | अचलपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नेमके कोण?

अचलपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नेमके कोण?

Next

अनिल कडू

परतवाडा : काही महिन्यांपासून अचलपूर नगरपालिकेला पूर्णवेळ नियमित मुख्याधिकारी नाही. दरम्यान प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या संगीत खुर्चीने नागरिक व नगरपालिका प्रशासन त्रस्त झाले आहे.

या संगीत खुर्चीच्या अनुषंगाने प्रभारी मुख्याधिकारी सवडीनुसार आळीपाळीने त्या खुर्चीत बसत आहेत. जणू काही, ‘काही दिवस मी आणि काही दिवस तू‘ या भूमिकेतून या प्रभारी मुख्य अधिकाऱ्यांनी ती खुर्ची वाटून घेतली आहे. याकरिता वेगवेगळे निमित्त आणि रजा कारण पुढे येत आहेत. अचलपूर नगर परिषद क्षेत्र कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असताना व दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही या प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना नागरिकांशी काहीएक घेणे-देणे नाही.

या प्रभारी मुख्याधिकाऱ्यांचा अचलपूर नगरपालिकेत येण्याचा दिवस व वेळ काळ निश्चित नाही. आपल्या सवडीप्रमाणे ते येतात आणि अर्थपूर्ण व्यवहारांशी निगडित ठेकेदारांच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी करून निघून जातात. यातूनच अमरावती मार्गावरील नवीन ले-आउटसुद्धा चर्चेत आले आहे. या अशा दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यात ते इतके मग्न होतात की, नागरिकांच्या समस्यांकडे व कोरोनाच्या स्फोटक परिस्थितीकडे बघण्यासही त्यांना वेळ मिळत नाही. समस्या घेऊन भेटायला येणाऱ्यांच्या समस्या सोडविण्याकडेही त्यांचा कल नाही. अशा या परिस्थितीत नगरपालिका प्रशासनासह शहरवासी वाऱ्यावर सोडल्यागत आहेत. अशात नगरपालिकेच्या सभांना या प्रभारी मुख्य अधिकाऱ्यांची असलेली अनुपस्थिती लक्षवेधक ठरत आहे. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी अचलपूर नगर परिषदेत सवडीप्रमाणे येऊन ज्या दस्तऐवजांवर स्वाक्षऱ्या केल्यात, त्याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

अचलपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांची पदोन्नतीवर इतरत्र बदली झाल्यामुळे मुख्याधिकारीपद रिक्त झाले. या रिक्त पदी मुख्याधिकारी म्हणून राजेंद्र फातले रुजू झालेत. पण, तेही या ठिकाणी रुजले नाहीत. आपल्या सोयीकरिता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पदस्थापना मिळविली. यातच ते दीर्घ रजेवर गेलेत. अचलपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून राजेंद्र फातले कार्यरत नसले तरी त्यांच्या नावाची पाटी मुख्याधिकारी कक्षाच्या दर्शनी भागात आजही झळकत आहे. आजही पाटी नागरिकांकरिता चकव्याचे काम करत आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी नेमके कोण, याविषयी ही फातले यांच्या नावाची पाटी नागरिकांना बुचकळ्यात टाकत आहे.

फातले आपल्या सोयीच्या ठिकाणी बसल्यानंतर त्यांचा अतिरिक्त पदभार अंजनगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमेध अलोने यांच्याकडे दिला गेला. सुमेध अलोने मनमर्जीने दोन-चार दिवस अचलपूर नगर परिषदेत आलेत. पण पुढे ते कोरोनाच्या अनुषंगाने सुटीवर गेले. नंतर मोर्शीच्या मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्याकडे अचलपूरचा अतिरिक्त प्रभार दिला गेला. त्याही सवडीनुसार अचलपूर नगर परिषदेत आल्यात. दरम्यान गीता ठाकरे रजेवर गेल्यात. त्यामुळे परत अंजनगावचे मुख्याधिकारी सुमेध अलोने यांऱ्याकडे प्रभार दिला गेला.

अचलपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या या संगीत खुर्चीत अलोने आणि ठाकरे आळीपाळीने बसल्यात. त्यांनी काही निवडक दस्तऐवजांवर स्वाक्षऱ्या केल्यात. ते दस्तऐवज आज चर्चेत आले आहेत. आळीपाळीने वाटून घेतल्यागत. अचलपूर मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसणाऱ्या या प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या नावाची पाटी मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर लावली नाही. दरम्यान गीता ठाकरे यांनी आपले नाव कॉम्प्युटरमधून एका कागदावर अंकित करून त्याची प्रिंट काही दिवस राजेंद्र फातले यांच्या पाटीवर चिटकवली होती. पण त्या रजेवर जाताच त्यांच्या नावाचा तो कागद त्या कक्षासमोर खाली पडला आणि पायदळी तुडविला गेला.

बॉक्स

मुख्याधिकारी दाखवा, बक्षीस मिळवा

अचलपूर नगर परिषद मुख्याधिकारी यांचे पद वर्ग एक श्रेणीचे आहे. त्यांचा पदभार वर्ग एक श्रेणीच्या अधिकाऱ्याकडे जाणे अपेक्षित आहे. पण प्राप्त माहितीनुसार, वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांकडे हा अतिरिक्त प्रभार जिल्हा प्रशासनाकडून दिला गेला.

अचलपूर नगरपालिका जिल्ह्यातील एकमेव अ वर्ग नगरपालिका असून या नगरपालिकेला काही महिन्यांपासून नियमित मुख्याधिकारी मिळू नये हेच खरे शहरवासीयांचे व नगरपालिका प्रशासनाचे दुर्दैव ठरले आहे. दरम्यान या प्रभारीच्या खेळात अचलपूर पालिकेचे मुख्याधिकारी दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Who exactly is the Chief Minister of Achalpur Municipal Council?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.