गणेश वासनिक लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत महापालिका हद्दीतील शाळांना खिचडी वाटप ही शाळा व्यवस्थापन समितीमार्फत महिला बचत गटाकडून करण्यात येत आहे; मात्र सुटीच्या दिवशीही विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ली अशी खुद्द कबुली मुख्याध्यापकांनी पोर्टलवर सादर केलेल्या माहितीनुसार समोर आली आहे. अमरावती महापालिकेच्या आठ शाळांमध्ये हा नियमबाह्य प्रकार झाल्याचे समोर आले असून शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
राज्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी पोर्टलवर सुटीच्या दिवशी शाळांनी उपस्थितीची नोंद केल्याबाबत ताशेरे ओढले आहेत. एवढेच नव्हे तर शाळांनी केलेल्या नोंदीच्या आधारे शाळांचे इंधन, भाजीपाल्याची देयके ऑनलाईन पद्धतीने जनरेट करण्यात येत असून शाळांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग केले जाते; परंतु बहुतांश शाळांनी शासकीय सुटीच्या दिवशीही विद्यार्थ्यांनी आहार घेतल्याची नोंद पोर्टलवर केल्याचे दिसून आले. ही आहार चोरी पकडल्याने जिल्हा परिषद, मनपा शिक्षणाधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एएमएस पोर्टलवरील नोंदीचा आढाव्याचे निर्देश शिक्षण संचालकांनी दिले. त्यामुळे आर्थिक फसवणूक करणाऱ्या शाळांविरुद्ध कडक प्रशासकीय कारवाईच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना मिळाल्या आहेत.
एक विद्यार्थी दीडशे ग्रॅम खिचडी खातो का?महापालिका क्षेत्रातील शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांकडून विद्यार्थी हक्क संदर्भात नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. त्यामुळे दरदिवशी विद्यार्थी संख्येनुसार एका विद्यार्थ्यांला दीडशे ग्राम खिचडी मिळते, पण ईतकी खिचडी खरचं विद्यार्थी खातो का? हा संशोधनाचा विषय आहे. टक्केवारी प्रवृत्तीमुळे विद्यार्थी हक्काचे धान्य बायपास होते, अशी ओरड आहे.
महापालिका हद्दीत ३४० शाळांना परवानगीमहापालिका हद्दीत खासगी, अनुदानित आणि विनाअनुदानित अशा एकूण ३४० शाळा कार्यान्वित आहेत. या शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या नियंत्रणात महिला बचत गटाद्वारे विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो; मात्र काही शाळांनी सुटीच्या दिवशीही पोर्टलवर उपस्थितीची नोंद दर्शवून अनुदान लाटण्याचा प्रकार शिक्षण संचालकांनी उघडकीस आणला.
शासकीय सुटीच्या दिवशी या शाळांनी केली उपस्थितीची नोंद
- महापालिका मराठी शाळा, बेनोडा
- महापालिका उर्दू गर्ल्स स्कूल नंबर ३ जुनीवस्ती बडनेरा
- महापालिका मराठी शाळा अकोली
- संत गाडगे बाबा प्रायमरी स्कूल, शिवाजीनगर
- महापालिका प्रायमरी मराठी स्कूल नंबर २०, नवाथे नगर
- असोसिएशन उर्दू गर्ल्स हायस्कूल चांदनी चौक अमरावती
- महापालिका उर्दू प्रायमरी स्कूल नंबर ५ फ्रेजरपुरा अमरावती
- उच्च न्यायालय खंडपीठाने ५ मे रोजी २०२४ च्या आदेशाला स्थगनादेश दिला.
"सुटीच्या दिवशी पोर्टलवर ऑनलाइन विद्यार्थ्यांची नोंदणी करणाऱ्या पाच शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सोमवार १९ मेपर्यंत खुलासे सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या असून सुटीच्या दिवशी पोर्टलवर माहिती ही चूक अनावधानाने झाली आहे."- डॉ. प्रकाश मेश्राम, शिक्षणाधिकारी, महापालिका