कुठे मुबलक, तर कुठे पाण्यासाठी भटकंती
By Admin | Updated: June 15, 2014 23:15 IST2014-06-15T23:15:32+5:302014-06-15T23:15:32+5:30
जीवन प्राधिकरणच्या नियोजनाअभावी शहरातील काही भागात पाणीटंचाई तर काही भागात मुबलक पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचे देयके नियमित भरुनही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने

कुठे मुबलक, तर कुठे पाण्यासाठी भटकंती
अमरावती: जीवन प्राधिकरणच्या नियोजनाअभावी शहरातील काही भागात पाणीटंचाई तर काही भागात मुबलक पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचे देयके नियमित भरुनही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शहरात ९५ हजार ग्राहक आहेत. या नळधारकांसाठी पाण्याच्या १५ टाकीतून पाणीपुरवठा केला जातो. तसेच महापालिकेंतर्गत ९३३ ठिकाणी सार्वजनिक नळातून पाणीपुरवठा जातो. जीवन प्राधिकरणचा पाणीपुरवठा गॅ्रव्हिटीच्या माध्यमातून होत असल्यामुळे शहरातील अनेक परिसरात पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याची ओरड सुरुच आहे. काही परिसरात मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याचा अपव्यव होताना दिसत आहे. मात्र काही भागांमध्ये कृत्रिम पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. नियमित पाण्याचे देयके भरुनही पाण्यासाठी नागरिकांना थेंबा-थेंबाची प्रतीक्षा करावी लागत आहे. बडनेरा, जेवडनगर, साईनगर, नवाथेनगर, कृष्णार्पण कॉलनी व अन्य काही परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.
जेवडनगर परिसरात पहाटे पाच वाजताच्या सुमारास पाणीपुरवठा केला जातो. केवळ पंधरा मिनिटांत पाणीपुरवठा बंद होतो. ज्यांनी नळावर टिल्लू पंप बसविले त्यांनाच पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याने इतरांची परवड होताना दिसत आहे. सकाळच्या सुमारास नळ येतात नागरिक पाणी भरण्याची घाई करतात; मात्र नळाची धार कमी असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. अनेकदा नागरिकांनी पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी जीवन प्राधिकरणकडे केल्या आहेत. मात्र त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. पाणीपुरवठा कमी होत असल्यामुळे अनेक कुटुंबीयांच्या दिनचर्यवर मोठा परिणाम जाणवत आहे. काही भागात तर नळ गेल्यावरही नागरिक हापसीवर पाणी भरताना दिसून येत आहे.
एकीकडे सार्वजनिक नळावरील पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे तर दुसरीकडे थेंबा थंबाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरण करते तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.