धारणीतील ९० लाखांच्या अंडीपुरवठा बनावट देयकेप्रकरणी एफआयआर कधी होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:23 IST2025-12-16T13:20:41+5:302025-12-16T13:23:36+5:30
Amravati : धारणी येथील एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालय अधिनस्थ आश्रमशाळांना ९० लाखांच्या अंडी बनावट देयके प्रकरणी पुन्हा एफआयआर होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

When will there be an FIR in the fake payment of egg supply worth Rs 90 lakhs in Dharani?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धारणी येथील एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालय अधिनस्थ आश्रमशाळांना ९० लाखांच्या अंडी बनावट देयके प्रकरणी पुन्हा एफआयआर होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या बनावट देयके प्रकरणात कंत्राटदारांसह काही कर्मचारी देखील सहभागी असल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. आता हे प्रकरण पुन्हा लवकरच पोलिसांत जाणार आहे.
आदिवासी विकास विभाग अधिनस्थ धारणी एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालयातून ३ जून २०२४ रोजी खिडकी कटरने कापण्यात आली. नेमके ज्या आलमारीत बनावट अंडी, केळी देयकांची फाइल होती, तेच कपाट तोडून फाइल लंपास करण्यात आली होती. मात्र अंडीचा पुरवठा झालाच नाही तरीही ९० लाखांची बनावट देयके प्रकरणाची बाब माहिती अधिकार प्राप्त अर्जानंतर हे बिंग फुटले. याप्रकरणी धारणी पोलिसांत तक्रार नोंदविली गेली. मात्र, संबंधितांनी हे प्रकरण मॅनेज करून चौकशीच्या नावे थंडबस्त्यात टाकले होते. मात्र आता हे प्रकरण पुन्हा तापणार आहे.
आश्रमशाळांतून पावती, कागदपत्रांची जुळवाजुळव
धारणीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी वरिष्ठांच्या निर्देशानुसार २० लाखांचे बनावट अंडी देयकाच्या प्रकरणाचा नोव्हेंबर २०२५ पासून नव्याने तपास चालविला आहे. आश्रमशाळातून अंडी पुरवठ्याची पोच पावती, मुख्याध्यापकांचा शेरा आदी कागदपत्रे जुळवाजुळव पथकाद्वारे केली जात आहे.
कंत्राटदारांसह त्रिकुटांचा सहभाग
जळगाव येथील श्री स्वामी समर्थ पुरवठादाराच्या नावे अंडी पुरवठ्याची बनावट देयके काढण्यात त्रिकुटाचा सहभाग आहे. यातील 'मास्टर माइंड' हल्ली अमरावतीत आहे. ९० लाखांची अंडी देयके कशी काढायची, ती फाइल केव्हा पीओंच्या समोर मंजुरीसाठी ठेवायची हे सर्व मॉनिटरिंग कळमनुरीतून केल्याची माहिती आहे. स्वामी समर्थचे लागेबांधे धारणी पीओ ते अमरावती एटीसी असे आहेत. यात एका महिला गृहपालाचे 'चोरी चोरी, चुपके चुपके' प्रकरणदेखील आहे.