एसटी महामंडळाने मागणी केलेल्या इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा केव्हा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 18:09 IST2025-09-16T18:08:19+5:302025-09-16T18:09:47+5:30
एसटी बसची प्रवाशांना प्रतीक्षा : नव्या जुन्या बसेसवर मदार

When will the electric buses demanded by the ST Corporation be supplied?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एसटी महामंडळाच्या ताफ्यात केवळ १५ इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत. अजूनही उर्वरित बसेच अप्राप्त आहेत. याशिवाय २५ नवीन लालपरी बसची प्रतिक्षा कायम आहे. एकूण मागणीतील अन्य बसेस अद्याप मिळाल्या नाहीत.
दसरा, दिवाळी सण जवळ आला आहे. या सणा दरम्यान प्रवाशांची मोठी गर्दी असते. परंतु बसेसची संख्या मात्र कमी असते. जिल्ह्यात विद्यापीठाजवळ एकमेव इलेक्ट्रिक बसेस चार्जिंग स्टेशन सुरू झाले आहे, मात्र चांदुर बाजार वगळता इतर ठिकाणचे चार्जिंग स्टेशनचे काम अद्याप सुरू झाले नाही. अशातच एसटी महामंडळाने मागणी केलेल्या बसचा पुरवठा परिपूर्ण झालेला नाही. अगोदरच एसटी बसेसची संख्या कमी आहे. सणासुदीच्या दिवसात प्रवाशी वाढतात. मात्र बसेस कमी असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. विभागाच्या इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या मात्र मागणीच्या तुलनेत कमी बसेस मिळाल्या आहेत. एसटी महामंडळाने २५१ बसेसची मागणीपैकी आतापर्यंत अमरावती आगाराला १५ इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्यात. मात्र, उर्वरित बसेस अद्याप अप्राप्त आहेत. परिणामी अमरावतीचा अपवाद सोडला तर बडनेरा, दर्यापूर, परतवाडा, वरूड, मोर्शी, चांदूर रेल्वे या आगारांना इलेक्ट्रिक बस मिळाल्या नाहीत. ५५ लालपरीची मागणी असताना केवळी २६ बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. अद्याप २५ लालपरीची महामंडळाला प्रतीक्षा आहे..
आरामदायी सुविधा
आरामदायी सुविधांसह चालणाऱ्या इलेक्ट्रिक बसमधून विनाचालक प्रवास करण्यासाठी ऑनलाइन तिकीट घेण्याकरिता खिडकीवर रांगा लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. महामंडळाच्या महसुलात भर पडत आहे.
केवळ अमरावतीचे चार्जिंग स्टेशनचे कार्यान्वित
अमरावती येथील एसटी महामंडळाच्या कार्यशाळेत इलेक्ट्रिक बसेस चार्जिंगसाठी सुरू झाले आहे. मात्र, उर्वरित ७ पैकी चांदूर बाजार अपवाद सोडला तर सहा आगारात इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनचे काम सुरू झाले नाही.
"अमरावती विभागात एसटी महामंडळाच्या ताफ्यात १५ इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत. यासोबतच लालपरी बसेस आल्या आहेत. उर्वरित बसेस दिवाळीपूर्वी अमरावती विभागात प्रवासी सेवेसाठी उपलब्ध होतील."
- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक