संत्रा उत्पादक केव्हा होणार ‘शापमुक्त’?
By Admin | Updated: October 30, 2014 22:45 IST2014-10-30T22:45:35+5:302014-10-30T22:45:35+5:30
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणविणाऱ्या वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादकांची सध्याची दैनावस्था पाहता येथील संत्रा उत्पादकांचे पुनरूज्जीवन करण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले, असेच म्हणावे लागेल.

संत्रा उत्पादक केव्हा होणार ‘शापमुक्त’?
संजय खासबागे - वरूड
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणविणाऱ्या वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादकांची सध्याची दैनावस्था पाहता येथील संत्रा उत्पादकांचे पुनरूज्जीवन करण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले, असेच म्हणावे लागेल. संत्रा प्रक्रिया उद्योग तर तालुक्यात निर्माण होऊच शकले नाहीत, उलट मायवाडीतील शासकीय संत्रा प्रक्रिया केंद्राचे तीनतेरा वाजले आहेत.
तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठी आहे. तब्बल २१ हजार ५०० हेक्टरमध्ये संत्र्याची लागवड आहे. यामध्ये १६ हजार हेक्टरमध्ये फळे देणारी संत्रा झाडे आहेत. सन १९८२ मध्ये कोळशी रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामध्ये संत्रा उत्पादकांना मोठा फटका बसल्याने ते हवालदिल झाले. नंतर पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवल्याने लाखो संत्राझाडांवर कुऱ्हाडी चालल्या. यामुळे विदर्भाचा कॅलिफोर्निया वाळंवट होण्याच्या मार्गावर होता. परिणामी सिंचनाकरिता प्रकल्प आले. अमरावती जिल्ह्यात सिंंचनाखाली असणारे सर्वात मोठे क्षेत्र वरुड तालुक्यात आहे.
तालुक्याचे गतवैभव अभिमानास्पद आहे. येथील शेतकऱ्यांनी एकापेक्षा एक सरस कृषी प्रयोग केले आहेत. असे असले तरी कोट्यवधींचे उत्पन्न देणाऱ्या संत्र्यावर प्र्रक्रिया करण्याचा कोणताच कारखाना या भागात नाही. देशातील बाजारपेठेत संत्रा वैयक्तिकरीत्या पाठवण्याची शेतकऱ्यांची तयारी नाही. व्यापाऱ्यांच्या हाती संत्राबागा विकण्याची पध्दत या भागात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संत्र्याला भाव मिळणे अगदी दुरापास्त झाले आहे. संत्राची साठवणूक करण्याकरिता शीतगृहेसुध्दा नाहीत. यामुळे संत्र्याचे उत्पादन सोडून आता बागायती पिकाकडे शेतकरी वळला आहे. मिरची, कपाशी आदी पिके शेतकरी घेऊ लागला आहे.
ज्यूस निर्यातीच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली शेंदूरजनाघाटमधील ज्यूस फॅक्टरी पाच वर्षांत कर्जबाजारी झाली आणि मध्यवर्ती बँकेला ही जागा विकावी लागली. त्यानंतर वरुडमध्ये ‘सोपॅक’ नामक खासगी संत्रा प्रक्रिया उद्योग १९९२ मध्ये उभारण्यात आले. मात्र तेदेखील बंद पडले. त्यानंतर मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे शासनाद्वारे नोगा शासकीय संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला. शासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्पदेखील बंद पडला आहे.
सन १९९२ मध्ये सहकारी तत्त्वावर उभ्या राहिलेल्या 'सोपॅक' प्राईव्हेट लिमिटेड कंपनीतून संत्राच्या रसाने भरलेल्या बॉटल ‘सोपॅक’ नावाने बाजारात विक्रीकरिता आणले गेले. परंतु केवळ राजकारणाच्या हेवेदाव्यात ही कंपनी बंद पडली.
सिंंचनाच्या विविध योजना या तालुक्यात आहेत. वर्धा डायव्हर्शन सुपर एक्सप्रेस कालवा तयार झाल्यास तालुक्यातील सर्व नद्या बारमाही वाहत्या ठेवल्या जाणार आहेत, हे निश्चित. मात्र, हा प्रकल्प केव्हा पूर्णत्वास येईल हे आजही न समजणारे कोडेच आहे. वर्धा डायव्हर्शनला पूरक अशा पंढरी मध्यम प्रकल्पासह आदी प्रकल्प तयार झाले. तालुक्यात एकूण १५ सिंचन प्रकल्प आहेत. परंतु गत पाच वर्षांपासून निधीअभावी वर्धा डायव्हर्शनसारखी योजना रेंगाळते की काय, असे चित्र दिसू लागले आहे.
सन १९९५ मध्ये मोर्शीतील मायवाडी येथे नोगा नावाने संत्रा प्रक्रिया केंद्राचा गवगवा झाला. परंतु प्रत्यक्षात येथे संत्र्याला व्हॅक्सीनेशनच केले गेले. या प्रक्रिया केंद्राचे तत्कालीन वित्तमंत्री रामराव आदीक यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले होते. तीन वर्षांपूर्वी दुसऱ्यांदा या प्रकल्पाचे ेउद्घाटन करण्यात आले. मात्र त्यानंतरही हा प्रकल्प केवळ दोनच दिवस सुरू राहिला आणि या प्रकल्पावर केलेला कोट्यवधींचा खर्च वाया गेला. ही संत्रा उत्पादकांची शोकांतिका आहे.