१.८५ लाख शेतकऱ्यांना पिकविम्याची भरपाई केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:13 IST2021-04-11T04:13:14+5:302021-04-11T04:13:14+5:30
गजानन मोहोड अमरावती : खरीप २०२० करिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील १,८५,३३२ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. यासाठी १५.६२ ...

१.८५ लाख शेतकऱ्यांना पिकविम्याची भरपाई केव्हा?
गजानन मोहोड
अमरावती : खरीप २०२० करिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील १,८५,३३२ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. यासाठी १५.६२ कोटी रुपये शेतकऱ्यांनी कंपनीकडे जमा केला. याशिवाय केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ४७.७९ कोटींचा प्रिमियम आहे. आता यंदाचा खरीप लागणार असताना कंपनीद्वारा विम्याची भरपाई जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत.
यापूर्वीचा आढावा घेता सधारणपणे मार्च महिन्यात पीक विम्याची भरपाई कंपनीस्तरावर जाहीर करण्यात येत असते. यंदा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत ५० पैशांच्या आत पैसेवारी व दुष्काळी स्थिती असताना कंपनीद्वारा विमा भरपाईसाठी दिरंगाई केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. गतवर्षीच्या हंगामापासून या योजनेची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून विमा कंपनीची तीन वर्षांकरिता निवड केली जाते. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे व उत्पादनाच्या जोखमेपासून शेतकऱ्यांना संरक्षण देणे हे योजनेचे उद्दिष्टे आहेत. मात्र, यंदा या विपरीत स्थिती असल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी पीक विमा योजना प्रथमच कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक, स्वरुपाची आहे व योजनेत जोखीमस्तर ७० टक्के निश्चित करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील १.८५ लाख शेतकऱ्यांनी जून २०२० मध्ये या योजनेत सहभाग नोंदविला असताना अद्याप भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे भरपाई केव्हा, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
बॉक्स
सोयाबीनचे काढणीपश्चात नुकसान
विमा योजनेमध्ये नमुद स्थानिक नैसर्गिक आपत्तीमूळे काढणीपश्चात होणारे पिकांचे नुकसान या बाबीचा समावेश आहे. यंदा परतीच्या पावसामूळे सोयाबीन उद्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. याशिवाय सततच्या पावसामुळे कपाशीची बोंडसड होवूण मोठ्या प्रमाणात बोंडगळ झालेली आहे. त्यामुळे पीक विमा भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
बॅाक्स
योजनेत शेतकऱ्यांचा तालुकानिहाय सहभाग
या पीक विमा योजनेत अचलपूर तालुक्यातील ८३८९, अमरावती १०,६१०, अंजनगाव सुर्जी २०,०१७, भातकुली १८,४५८, चांदूर रेल्वे ८,२१९, चांदूरबाजार ८,६३७, चिखलदरा ७६०, दर्यापूर ३७,७९३, धामणगाव ५,६२३, धारणी ३,९११, मोर्शी ९,५४३,
नांदगाव खंडेश्वर ४४,४३०, तिवसा ६,३११ व वरुड तालुक्यातील २६३१ शेतकऱ्यांचा सहभाग आहे.
पाईटर
* पीक विमा योजनेत एकूण सहभाग : १,८५,३३२
* शेतकऱ्यांनी भरलेला प्रिमियम : १५,६२ कोटी
* शासन व शेतकऱ्यांचा प्रिमियम : १०९.२० कोटी
* संरक्षित क्षेत्र : १,७६,२८४ हेक्टर
* संरक्षित विमा : ६३६,२१ कोटी