अमरावती-नागपूर, भुसावळ पॅसेंजर धावणार तरी कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 05:01 IST2021-12-18T05:00:00+5:302021-12-18T05:01:05+5:30
अमरावती, बडनेरा रेल्वेस्थानकाहून तब्बल ४२ रेल्वे गाड्यांची धडधड सुरू आहे. हल्ली अमरावती ते वर्धा, भुसावळ ही मेमू रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही अमरावती ते नागपूर, भुसावळ, पॅसेंजर, इंटरसिटी अजून सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे कमी अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याकडे लक्ष देत भुसावळ मध्य रेल्वे विभागाने तत्काळ पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

अमरावती-नागपूर, भुसावळ पॅसेंजर धावणार तरी कधी ?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेल्वे विभागाने आता रेल्वे गाड्यांचा स्पेशल दर्जा काढून सर्व एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, केवळ एकच मेमू सुरू केल्याने पॅसेंजर गाड्या कधी सुरू होणार, असा प्रश्न आता प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.
अमरावती, बडनेरा रेल्वेस्थानकाहून तब्बल ४२ रेल्वे गाड्यांची धडधड सुरू आहे. हल्ली अमरावती ते वर्धा, भुसावळ ही मेमू रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही अमरावती ते नागपूर, भुसावळ, पॅसेंजर, इंटरसिटी अजून सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे कमी अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याकडे लक्ष देत भुसावळ मध्य रेल्वे विभागाने तत्काळ पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पॅसेंजरने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने याचा विचार होणे गरजेचे आहे.
केवळ मेमू झाली सुरू
- अमरावती रेल्वेस्थानकाहून अमरावती ते वर्धा, भुसावळ एकच मेमू सुरू आहे.
- नागपूर ते अमरावती इंटरसिटी या गाड्या रेल्वे विभागाने सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
जनरल तिकीट बंदच
सर्व रेल्वे गाड्या नियमित करण्यात आल्या असल्या तरी आरक्षणाची अट अजूनही कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य तिकिटांची विक्री अजूनही बंदच आहे. त्यामुळे प्रवाशांना आरक्षित तिकिटांची खरेदी करावी लागत आहे.
- कोरोनामुळे आधीच रेल्वेगाड्या बंद होत्या. त्यातच स्पेशल ट्रेन सुरू झाल्या. मात्र, आता आरक्षणाची अट रद्द करण्याची मागणी होत आहे.
प्रवाशांच्या खिशाला झळ
पॅसेंजर रेल्वे अजूनही सुरू न झाल्याने अपडाऊन करण्यास अडचण येते. परिणामी, वर्धा येथेच खोलीवर राहावे लागते. अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याने खिशालाही चांगलीच झळ बसते.
- प्रवीण कस्तुरे, प्रवासी.
रेल्वे विभागाने गाड्या नियमित जरी केल्या तरी आरक्षणाची अट कायम आहे. पॅसेंजर गाड्याही सुरू केलेल्या नाहीत, त्यामुळे अतिरिक्त पैसे मोजावे लागते. खासगी वाहनाने अपडाऊन करावे लागत आहे.
- राजेश सपकाळे, प्रवासी