११०० कोटींचे कर्जवाटप केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:34 IST2019-08-05T22:33:58+5:302019-08-05T22:34:19+5:30
प्रत्येक वेळी तंबी देऊन काम भागत नाही, तर कधी कृतीही पाहिजे. मात्र, जिल्हा प्रशासनाला अद्यापही हे साध्य न झाल्यामुळे बँका तंबीला जुमानेनासा झालेल्या आहेत. त्यामुळे चार महिन्यांच्या अवधीत खरीप पीक कर्जवाटपाचा टक्का २६ वरच रखडलेला आहे. अद्यापही ११५३ कोटींचे वाटप बाकी असल्याने या बँकावर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

११०० कोटींचे कर्जवाटप केव्हा?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रत्येक वेळी तंबी देऊन काम भागत नाही, तर कधी कृतीही पाहिजे. मात्र, जिल्हा प्रशासनाला अद्यापही हे साध्य न झाल्यामुळे बँका तंबीला जुमानेनासा झालेल्या आहेत. त्यामुळे चार महिन्यांच्या अवधीत खरीप पीक कर्जवाटपाचा टक्का २६ वरच रखडलेला आहे. अद्यापही ११५३ कोटींचे वाटप बाकी असल्याने या बँकावर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
सलग चार वर्षांच्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यामुळे खरिपासाठी आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना कर्जवाटपास जिल्ह्यातील बँकाचे असहकार्य आहे. मागील हंगामातदेखील बँकांचा नन्नाचा पाढा होता. वारंवार सूचना देऊनही राष्ट्रीयीकृत बँका जुमानत नसल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्टेट बँक आॅफ इंडिया व जिल्ह्यात लीड बँक असलेल्या सेंट्रल बँक आॅफ इंडियाची खाती बंद केली तसेच काही प्रकरणात व्यवस्थापकांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. परिणामी या बँकांची नामुष्की झाल्याने त्यांनी कर्जवाटपाचा टक्का वाढविला होता. तत्कालीन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनीदेखील बँक व्यवस्थापनाला निकराचा इशारा दिला होता. त्याच्या परिणामी कर्जवाटपाची गती वाढली होती. यंदा मात्र केवळ इशारे दिले जात असल्याने बँक व्यवस्थापनावर फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे पालकमंत्री तथा कृषिमंत्री अनिल बोंडे व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याद्वारे प्रत्यक्ष कृती केव्हा, असा शेतकºयांचा सवाल आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी १ एप्रिल २०१९ पासून कर्जवाटप सुरू झाले. प्रत्यक्षात जून अखेरपासून सुरुवात झाली. जिल्हा बँकेनेदेखील सुरुवातीला धडाका लावला व आता प्रक्रिया रखडली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचा टक्का सुरुवातीपासून मंदावला आहे. त्यामुळे कर्जवाटपाचा टक्का अद्याप वाढलेला नाही. जिल्ह्यात यंदाच्या खरिपासाठी २ लाख ६० हजार ५७० शेतकऱ्यांना १६८५ कोटी रुपये कर्जवाटपाचे लक्ष्यांक होते. त्यातुलनेत सद्यस्थितीत बँकांनी ३९ हजार ९७० शेतकºयांना ४३१ कोटी ८७ लाखांचे वाटप केले. अद्यापही ११५३ कोटी १३ लाखांचे कर्जवाटप झालेले नाही.
असे आहे बँकनिहाय कर्जवाटप
राष्ट्रीयीकृत बँकांना यंदाच्या खरिपासाठी १,६६,५७० शेतकºयांना ११४०.५० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत २१,०५६ शेतकऱ्यांना २७४.१६ कोटींचे वाटप करण्यात आले . ही टक्केवारी २४ आहे.
ग्रामीण बँकांना यंदाच्या खरिपासाठी २,००० शेतकऱ्यांना १४.५० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत ४१० शेतकºयांना ४.४४ कोटींचे वाटप करण्यात आले. ही टक्केवारी ३१ आहे.
जिल्हा बँकेला यंदाच्या खरिपासाठी ९२,००० शेतकºयांना ५३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत १८,५०४ शेतकºयांना १५३.२७ कोटींचे वाटप करण्यात आल. ही टक्केवारी २९ आहे.
शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी बँकांद्वारे कर्जमेळावे घेतले जात आहे. हेतुपुरस्सर कर्ज नाकारले जात असल्यास त्या व्यवस्थापकावर गुन्हा नोंदविला जाईल
- अनिल बोंडे
पालकमंत्री
सर्वच बँकाना कर्जवाटपाचा टक्का वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँका कर्ज देत नसल्यास शेतकऱ्यांनी सहकार किंवा महसूल विभागाकडे तक्रार करावी.
- शैलेश नवाल जिल्हाधिकारी