अमरावती विद्यापीठात एमपेट परीक्षेचा मुहूर्त केव्हा? कुलगुरूंनी अवास्तव खर्चावर घेतला आक्षेप
By गणेश वासनिक | Updated: October 29, 2023 17:34 IST2023-10-29T17:33:36+5:302023-10-29T17:34:06+5:30
अमरावती विद्यापीठ संलग्न पाचही जिल्ह्यासह राज्यभराचे साडेसहा हजार विद्यार्थी या परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत.

अमरावती विद्यापीठात एमपेट परीक्षेचा मुहूर्त केव्हा? कुलगुरूंनी अवास्तव खर्चावर घेतला आक्षेप
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने एमफील आणि पीएचडी प्रवेशाकरीता आवश्यक असलेली एमपेट परीक्षा अद्यापही घेतली नाही. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत असून, बाहय संस्थेला कंत्राट दिला जातो. तथापि परीक्षा का घेण्यात आली नाही, हा विषय हल्ली संशोधनाचा ठरत आहे. त्यामुळे अमरावती विद्यापीठ संलग्न पाचही जिल्ह्यासह राज्यभराचे साडेसहा हजार विद्यार्थी या परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत.
अमरावती विद्यापीठाच्या सामंजस्य करारानुसार एमपेट परीक्षांच्या नियोजनासाठी केंद्रावर सर्व व्यवस्था बाह्यसंस्थेने करणे अपेक्षीत आहे. मात्र, विद्यापीठातील काही अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी ‘निरीक्षक’ व ‘मार्गदर्शक’या गोंडस नावाखाली प्रत्येकी तब्बल १५ ते २० हजारांचे देयके काढतात. या निरीक्षकांची यादी पेट समिती अंतिम करते आणि कुलगुरुंची मान्यता घेते.
वास्तविक ‘डेसिग्नेटेड एजन्सी’ ला कंत्राट दिल्यानंतर केंद्रावरील सर्व जबाबदारी एजन्सी बघत असताना तांत्रिक ज्ञान नसलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांची केंद्रावर कशासाठी नियुक्ती होते? याचा शोध घेणे गरजेचे आहे. थोडक्यात पेट परीक्षा काहींना पर्वणी ठरते. त्याकरीता दरवर्षी लाखो रुपयांचा अग्रीम घेतला जातो. गत काही वर्षांपासून हा प्रकार बिनबोभाट सुरू आहे.
यूजीसीच्या गाईडलाईननुसार एमपेटची परीक्षा होणार आहे. नवीन निर्देश प्राप्त झाल्यामुळे समिती गठीत झाली होती. त्या समितीच्या काही सूचना असून, त्या दुरूस्तीसाठी विद्वत परिषदेच्या समोर ठेवल्या जातील. त्यांच्या मान्यतेनंतरच नव्या
डायरेक्शनुसार परीक्षा घेण्यात येतील.
- मोनाली तोटे-वानखडे, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ