महापालिकेत वीज बचतीचे आॅडिट केव्हा?
By Admin | Updated: December 7, 2014 22:43 IST2014-12-07T22:43:11+5:302014-12-07T22:43:11+5:30
महापालिकेचे वीज देयकावर महिन्याकाठी ७० लाख रुपये खर्च होत असताना या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी वीज बचतीचे आॅडिट करण्याचा निर्णय झाला. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी

महापालिकेत वीज बचतीचे आॅडिट केव्हा?
अमरावती : महापालिकेचे वीज देयकावर महिन्याकाठी ७० लाख रुपये खर्च होत असताना या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी वीज बचतीचे आॅडिट करण्याचा निर्णय झाला. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात प्रकाश विभाग माघारला असून वीजतंत्रीवर कुणाचाही अंकुश नसल्याचे चित्र आहे.
आयुक्त अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनानुसार उपायुक्त विनायक औगड यांनी कर्मचाऱ्यांच्या कामकाजांचे मूल्याकंन करण्यासह त्यांनी वेळेवर कार्यालयात पोहचून नागरिकांची कामे ही निर्धारित वेळेत करावी, यासाठी हजेरी ही बायोमॅट्रिक्स प्रणाली लागू केली आहे. मात्र प्रकाश विभागाचे कर्मचारी, वीजतंत्री हे एकदा कार्यालयात पोहचून बॉयोमॅट्रिक्सने थबींग केले की, त्यानंतर गायब होतात. वीजतंत्रीच्या कामकाजाचे मूल्याकंन करणारी यंत्रणा नसल्यामुळे त्यांचा कारभार हा मर्जीनुसारच सुरु आहे. महापालिकेत सुमारे १० वीजतंत्री असून प्रत्येकाला ४० हजार रुपये वेतन आहे. परंतु त्यांच्याकडे कामकाजाची जबाबदारी काय? हे अभियंते देखील सांगू शकत नाही. महावितरणने पथदिवे चालू- बंद करण्याची जबाबदारी झटकण्याचा पवित्रा घेतला असला तरी ही जबाबदारी महापालिका आयुक्तांनी महावितरणवरच सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. वीज देयकांवर नियंत्रण करण्यासाठी पथदिव्यांवर अनावश्यक जास्त क्षमतेचे दिवे काढून त्या जागी कमी प्रकाश क्षमतेचे दिवे लावून वीजेचे आॅडीट करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रकाश विभागाने वीज बचतीचे आॅडीट करण्याच्या या निर्णयाला बगल दिली. याउलट वीजेच्या देयकांची रक्कम वाढतच चालली आहे. पथदिवे चालू- बंद करण्याचा कालावधी निश्चित नसल्यामुळे महावितरणचे कर्मचारी त्यांच्या मर्जीनुसार पथदिवे चालू- बंद करतात. परिणामी वीजेचा अनावश्यक वापर होत असल्याचे वास्तव आहे. पथदिवे चालू- बंद करण्यावर वीज तंत्रीनी लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र त्यांची वेळकाढू भूमिका असल्याने वीजेचे देयके दरमहिन्याला वाढतच आहे. काही भागातील सकाळी १० वाजेपर्यंत पथदिव्यांवरील दिवे बंद केले जात नाही. याचा भुर्दंड महापालिकेला सहन करावा लागत आहे. ज्या पथदिव्यावर दिवे आवश्यक आहेत, त्या पथदिव्यांवर दिवे नसल्याची ओरड स्वत: नगरसेवकांची आहे. वारंवार तक्रारे नोंदवून देखील त्या पथदिव्यांवर दिवे लावण्याची जबाबदारी वीजतंत्री घेत नाहीत, असा आरोप अनेक सदस्यांच्या आहे. प्रकाश विभागाचे प्रमुख असलेले उपअभियंता अशोक देशमुख यांचा विभागावर अंकुश नसल्याचे दिसून येते. सकाळी कर्मचाऱ्यांनी बायोमॅट्रिक्सने हजेरी नोंदविली की, त्यानंतर शेवटी जाण्याच्या वेळेतच कार्यालयात ते दाखल होतात. प्रकाश विभागाचे कर्मचारी दिवसभर कुठे गायब होतात? हा संशोधनाचा विषय आहे. (प्रतिनिधी)