शेतमाल व्यापाऱ्याच्या गोदामात जाताच भाव कडाडले
By Admin | Updated: April 29, 2015 00:22 IST2015-04-29T00:22:54+5:302015-04-29T00:22:54+5:30
राज्य शासनाने धान्य बाजारातील साठेबाजांवरील नियंत्रण उठविल्याने धान्याची बेभाव विक्री सुरु आहे.

शेतमाल व्यापाऱ्याच्या गोदामात जाताच भाव कडाडले
लूट : शासनाने साठेबाजांवरील नियंत्रण उठविल्याचा परिणाम
प्रभाकर भगोले चांदूररेल्वे
राज्य शासनाने धान्य बाजारातील साठेबाजांवरील नियंत्रण उठविल्याने धान्याची बेभाव विक्री सुरु आहे. धान्याच्या भाव वधारल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे.
सोयाबीन, तूर, कापूस, मूग, तीळ हे पीक शेतकऱ्यांच्या गरजेनुसार व साठवणुकीवर तारण नसल्याने शेतकऱ्यांनी कवडी मोल भावात विकले. परंतु व्यापाऱ्यांच्या गोदामात जाताच धान्य भावात बेसुमार वाढ झाल्याने शासनाच्या धोरणावर तीव्र नापसंती शेतकऱ्यांनी दर्शविली आहे. ग्राहकांना मात्र चढ्या भावाने जीवनापयोगी वस्तू खरेदी कराव्या लागत आहे. व्यापाऱ्याकडूनच नफेखोरीचा व्यवसाय जोरात सुरु आहे. शासनाची नियंत्रण ठेवणारी अन्न विभागाची यंत्रणा मूग गिळून बसली आहे. शेतकऱ्यांचा माल बाजारात आल्याबरोबर तूरडाळ ७० रुपये किलो , तांदूळ ३८ रुपये, चनादाळ ४२ रु. मूगदाळ ८० रु. तेल ६८ रु. प्रतिकिलो चेर दर होते. आताचे दर तूरदाळ १०५, तांदूळ ५६, चनादाळ ५२, मूगदाळ १०५ ते ७५ रुपये अद्यावत आहे. यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी या बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्राहक संघटनेने केला आहे. शेतमालाचे दर घसरले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेतमाल तारण ठेवून बाजारभावाने ६० टक्के तारण कर्ज देण्याची शासनाची योजना आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था केवळ आर्थिक बाबींची तरतूद नसते. त्यामुळे तारणाची योजना कागदावरच असल्याची माहिती समोर आली आहे. शासनाने सध्या साठेबाजीवर नियंत्रणही उठविले असल्याने व्यापाऱ्यांनाही मुक्तपणे साठेबाजी करण्यासाठी व्यापारी मोकळे झाले आहे. यंदा आधीच नापिकी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले असतांना दुसरीकडे साठेबाजीचा प्रकार सुरु आहे. यापूर्वी पुरवठा खातेदार धान्य व इतर दुकानाची तपासणी करुन कार्यवाही होत होती. परंतु अधिकारी जातात चहापाणी घेवून निघून येतात, असे या ेयंत्रणेचे कार्य आजपर्यंत सुरू असल्याचा आरोप ग्राहक संघटनेने केला आहे.