पालकमंत्र्यांच्या ‘स्पेशल ड्राईव्ह’चे झाले तरी काय?
By Admin | Updated: July 30, 2014 23:45 IST2014-07-30T23:45:44+5:302014-07-30T23:45:44+5:30
पालकमंत्र्यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेच्या प्रसिध्दीसाठी ‘स्पेशल ड्राईव्ह’ काढण्याची घोषणा फसवी ठरली आहे. या योजनेची मुदतवाढ ३१ जुलै रोजी संपुष्टात आल्याने पालकमंत्र्यांच्या या घोषणेचे काय झाले,

पालकमंत्र्यांच्या ‘स्पेशल ड्राईव्ह’चे झाले तरी काय?
३१ जुलै अखेरचा दिवस : राष्ट्रीय पीक विमा योजनेला मुदतवाढ नाही; घोषणा फसवी?
गजानन मोहोड - अमरावती
पालकमंत्र्यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेच्या प्रसिध्दीसाठी ‘स्पेशल ड्राईव्ह’ काढण्याची घोषणा फसवी ठरली आहे. या योजनेची मुदतवाढ ३१ जुलै रोजी संपुष्टात आल्याने पालकमंत्र्यांच्या या घोषणेचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी अडचणीत आला असल्याने राष्ट्रीय पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवून त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पीक विमा योजनेच्या प्रसिद्धीसाठी १५ दिवसांचा ‘विशेष ड्राईव्ह’ काढण्याचे राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २१ जुलै रोजी आयुक्त कार्यालयात सांगितले. प्रत्यक्षात अशा पद्धतीची कुठलीही मोहीम कृषी विभागाद्वारा राबविण्यात आली नाही. शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या या योजनेची मुदत ३१ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. यावरून पुन्हा शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे स्पष्ट होते. खरीप हंगाम २०१४ करिता राष्ट्रीय पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. आधीच्या योजनेत बदल करून शासनाने सुधारित राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.
पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची दिशाभूल
६० ते ८० टक्के जोखीमस्तर व पिकानुरूप दर हेक्टरी १३ हजार ते ३ लाख ४२ हजार रुपयांपर्यंत विम्याचे संरक्षण कवच पिकांना लाभणार या अपेक्षेत शेतकरी असताना या योजनेची मुदत संपुष्टात येत आहे.
या योजनेचा कालावधी केवळ १० दिवसांचा राहिला आहे. वास्तविकत: ही योजना राबविण्याचा निर्णय ५ जुलै रोजी शासनाने घेतला. १० जुलै रोजी पीक विमा संदर्भातील कृषी व पणन मंत्र्यांच्या स्वाक्षरीचे पत्र जिल्ह्यात पोहचले. १६ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना सूचना दिल्यात. १८ जुलै रोजी जिल्ह्यातील बँकांना पीक विमाबाबतच्या सूचना देण्यात आल्यात.
प्रत्यक्षात योजनेच्या अंमलबजावणीसाठी १२ दिवस मिळालेत. यामध्येही ५ दिवसांच्या सुट्या आल्यात. परिणामी पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ ७ दिवस मिळालेत व अशा परिस्थितीत ३१ जुलै रोजी योजनेची मुदत संपत आहे. या हंगामात जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून पीक पेरणीला सुरूवात झाली अन चौथ्या आठवड्यात पीक विम्याची मुदत संपली ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. योजनेला किमान १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दोनदा संपर्क साधला, ते उपलब्ध होऊ शकले नाही.
शेतकऱ्यांना पीक विम्यात सवलत
शासनाने अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना सर्व पिकाकरिता विमा हप्त्यात ५० टक्के व कापूस पिकाकरिता ७५ टक्के सूट दिलेली आहे. तसेच कमाल भूधारक शेतकऱ्यांकरिता कापूस पिकासाठी ५० टक्के सूट देण्यात आली आहे.