लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाटातील आदिवासी बांधव निसर्गपूजक आहेत. वन्यजीवांचीही ते मनोभावे आराधना करतात. वाघाला ते श्रद्धेने 'कुला मामा' संबोधतात. अशा या मेळघाटातील टॅब्रुसोंडा-जामली-अंबापाटी-गिरगुटी मार्गावरील आदिवासीबहुल गिरगुटी गावाच्या शिवेवर एक वाघोबाचे मंदिर आहे.
गावापासून पुढे एक किलोमीटर अंतरावर अकोट धारणी मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात हे मंदिर आहे. वाघाची मूर्ती असलेले हे मेळघाटातील एकमेव मंदिर असून, या वाघाच्या मूर्तीला वेळोवेळी केल्या गेलेल्या रंगरंगोटीने त्याचे रूप बदलले आहे. अंगावरील पट्टे नजरेआड झाले असून, मानेभोवती त्याला आयाळ दिसत आहे.
'कुला मामा'चे मंदिर म्हणून ते प्रसिद्ध आहे. या छोटेखानी मंदिरात २५ वर्षांपूर्वी किंबहुना त्याहूनही आधी एक वाघाची मूर्ती बसविली गेली. त्यापूर्वी तेथे वाघाची मूर्ती नसली तरी 'कुला मामा' हे वाघाचे प्रतिरूप म्हणून त्या ठिकाणी आदिवासी बांधव अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होत आले आहेत.
लाकडापासून वाघाची प्रतिकृती, पाळणा
- आजही या ठिकाणी 'कुला मामाच्या दर्शनाला आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांसह दूरदुरून आदिवासी बांधव येतात. श्रद्धेने आपली मनोकामना त्या मंदिरात मांडतात.
- नंतर आदिवासी बांधव यथाशक्ती त्या ठिकाणी जेवणही देतात. चैत्र महिन्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव या ठिकाणी येतात.
- या मंदिरात आदिवासी बांधवांनी मनोभावे अर्पण केलेले लहान आकारातील अनेक लोखंडी त्रिशूल, लाकडापासून बनवली गेलेली वाघाची लहान प्रतिकृती, लाकडी पाळणा बघायला मिळतो.
वाघाचे वास्तव्य
- गिरगुटीसह लगतच्या जंगलात वन्यजीवांसह वाघाचे वास्तव्य आहे. जंगलात, शेतात वावरताना आपले वाघापासून संरक्षण व्हावे, आपल्याकडील पाळीव प्राण्यांना वाघाने कुठलीही हानी पोहोचवू नये, या श्रद्धेने आदिवासी बांधव कुला मामा'चे या मंदिरात स्मरण करतात.
- मूर्तीपुढे नतमस्तक होतात. तीन वर्षांतून एकदा लोकसहभागातून या ठिकाणी भंडारा (महाप्रसाद) केला जातो. यात गावकरी यथाशक्ती आपले योगदान नोंदवितात.