तहान लागल्यावर खोदणार विहीर; ७०० गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 00:19 IST2017-03-03T00:19:29+5:302017-03-03T00:19:29+5:30

जिल्ह्यात यंदा जानेवारी ते जून दरम्यान ७०० गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे.

The well digging when thirsty; Water shortage on 700 villages | तहान लागल्यावर खोदणार विहीर; ७०० गावांवर पाणीटंचाईचे सावट

तहान लागल्यावर खोदणार विहीर; ७०० गावांवर पाणीटंचाईचे सावट

अमरावती : जिल्ह्यात यंदा जानेवारी ते जून दरम्यान ७०० गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. यासाठी संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये ७३७ उपाययोजना प्रस्तावित आहेत. यासाठी ८ कोटी ७८ लाख ५६ हजार ्नरूपयांचा निधी खर्च होणार आहे.
पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई जाणवत नसली तरी दुर्गम भागात तसेच उंचावरील गावे व नादुरूस्त पाणीपुरवठा योजना आदी कारणांमुळे जिल्ह्यातील ७०० गावांना पाणीटंचाईची झळ जाणवणार आहे. पहिल्या टप्प्यात आॅक्टोबर २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत जिल्ह्यात कुठल्याच गावात पाणीटंचाईची स्थिती नव्हती. दुसऱ्या टप्प्यात जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीत ४३६ गावे व वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली. यासाठी जिल्हा परिषदेद्वारा ४५५ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यासाठी ५ कोटी ८२ लाख ५७ हजारांचा निधी खर्च होणार असून तिसऱ्या टप्प्यात एप्रिल ते जून २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील २६४ गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवणार आहेत. यासाठी दोन कोटी ९५ लाख ९९ हजारांचा निधी खर्च होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ११३ गावांमध्ये ११५ नवीन विंधन विहिरी, कुपनलिका करण्यात आल्यात. ११२ नळयोजनांची विशेष दुरूस्ती करण्यात आली. २७ गावांमध्ये तात्पुरत्या नळयोजना सुरू करण्यात आल्यात. ७५ विहिरींमधील गाळ काढण्यात आला. १०१ गावांमध्ये १०७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. काही कामांना अद्याप सुरूवात सुद्धा झाली नसल्याने तहान लागल्यावर विहीर खोदणार का, असा नागरिकांचा सवाल आहे. (प्रतिनिधी)

आठ कोटींवर खर्च
यंदा पाणीटंचाईच्या कृती आराखड्यामध्ये ८ कोटी ७८ लाख ५६ हजारांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये नवीन विंधन विहिरी व कुपनलिकांसाठी २ कोटी १५ लाख, नळ योजनांच्या विशेष दुरूस्तीसाठी ३ कोटी ६५ लाख, तात्पुरत्या नळ योजनेसाठी एक कोटी ४८लाख, टँकरद्वारा पाणीपुरवठ्यासाठी २७ लाख, विहिरींचे खोलीकरण, गाळ काढण्यासाठी ४४ लाख ३० हजार, विहिरी अधिग्रहित करण्यासाठी ७८ लाख ५१ हजारांचा निधी खर्च होणार आहे.
एप्रिल ते जून दरम्यान २८२ उपाययोजना
पाणीटंचाईची खरी झळ एप्रिल ते जून या कालावधीत पोहोचते. यासाठी कृती आराखड्यात २६४ गावांमध्ये २८२ उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये ७९ गावात ८२ विंधनविहिरी, कुपनलिका, ३० नळयोजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे. १३ तात्पुरत्या पुरक नळयोजना, ७ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा, ५८ गावांमधील ६७ विहिरींचे खोलीकरण करून गाळ काढण्यात येणार आहे. तसेच ७७ गावांमध्ये ८३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे.

Web Title: The well digging when thirsty; Water shortage on 700 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.