१०० कोटींची संपत्ती पाण्यात
By Admin | Updated: July 28, 2014 23:18 IST2014-07-28T23:18:48+5:302014-07-28T23:18:48+5:30
पूर्णा प्रकल्पातून अवेळी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तसेच चारघड धरण ओव्हरफ्लो झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे शेती, संत्राबागा व घरांची मोठी हानी झाली.

१०० कोटींची संपत्ती पाण्यात
चांदूरबाजार तालुक्यात पूर्णेचा कहर : शेती, संत्राबागा, घरे जमीनदोस्त
चांदूरबाजार : पूर्णा प्रकल्पातून अवेळी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तसेच चारघड धरण ओव्हरफ्लो झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे शेती, संत्राबागा व घरांची मोठी हानी झाली. यात विध्वंसक प्रलयात सुमारे १०० कोटींची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पूर्णेच्या प्रलयाचा सर्वाधिक फटका ब्राह्मणवाडा थडी या गावाला बसला. या एकट्या गावातील ३० कोटींवर संपत्तीचे नुकसान झाले आहे. यात नदीकाठची शेती, बागा पूूर्णत: वाहून गेल्या. तर घरांची मोठी हानी झाली. यात स्वप्नील वांगे नामक १८ वर्षीय युवकाला जीव गमवावा लागला. याशिवाय देऊरवाडा, काजळी, पिंप्री, थूगाव, कुरळ, राजना पूर्णा, टाकरखेडा पूर्णास, धानोरा, सर्फाबाद, आसेगाव, घाटलाकी, बेलमंडळी, यांसह नदीकाठच्या अन्य गावांना मोठा फटका बसला आहे.
या प्रलयामध्ये मोठ्या प्रमाणात घरातील भांडी, आलमाऱ्या, गॅस सिलिंडरसह संपूर्ण घरच उद्ध्वस्त होऊन नाहिसे झाल्याचे चित्र या गावात दिसले. यात गाई, म्हशीसुध्दा वाहून गेल्या. हे सर्व नष्टचर्य सुरू असताना प्रशासन मात्र उदासीन होते. गावकरी प्रशासनावर ताशेरे ओढत आहेत. धरणातून पाणी सोडण्याआधी प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले. या पुरात नदीकाठची शेते नष्ट झाल्याने बहुतेक ग्रामस्थांना आताच भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. संपूर्ण घरच उद्ध्वस्त झाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. या संकटाचा आढावा घेण्यासाठी सध्या तालुक्यात लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्षांसह सभापतींचे व अधिकाऱ्यांचे दौरे सुरू आहेत. (तालुका प्रतिनिधी)