महाविकास आघाडीचा ऑटो लवकरच पंक्चर करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:18 IST2021-08-27T04:18:01+5:302021-08-27T04:18:01+5:30
अमरावती : महाविकास आघाडीला सत्तेचा माज आला असून, हा तीनचाकी ऑटो लवकरच पंक्चर केला जाईल, असा इशारा राज्याचे माजी ...

महाविकास आघाडीचा ऑटो लवकरच पंक्चर करू
अमरावती : महाविकास आघाडीला सत्तेचा माज आला असून, हा तीनचाकी ऑटो लवकरच पंक्चर केला जाईल, असा इशारा राज्याचे माजी ऊर्जामंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकात बावनकुळे यांनी दिला आहे.
बावनुकळे हे ‘युवा वॉरियर्स’ अभियानांतर्गत अमरावतीत गुरुवारी आले असता, पत्रपरिषदेतून भाजपची पुढील वाटचाल विशद केली. १८ ते २५ वयोगटातील युवक, युवतींना देशाच्या जडणघडणीत सहभागी करून घेण्यासाठी हा उपकम असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या गलथान कारभारामुळे त्रस्त आहे. येत्या जिल्हा परिषद, महापालिका, नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप जनतेपर्यंत पाेहोचून महाविकास आघाडीने भकास कसे केले, याची माहिती देणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बेकायदेशीर अटक केली, हे न्याय दंडाधिकाऱ्यांनी जामीन देऊन सिद्ध केले आहे. शिवसेनेला सत्तेचा माज आला आहे. येत्या निवडणुकांमध्ये सेनेला जागा ठेवणार नाही, असे भाजपचे नियोजन आहे. अमरावती शहरात शिवसेनेने धुडघूस घातला असून, गुंड सैनिकांना अटक व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कळत नाही, राज्य कसे कळणार, असा टोलाही लगावला. याबाबत भाजपकडून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले जाणार आहे. पत्रपरिषदेला भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, आमदार प्रवीण पोटे, महापौर चेतन गावंडे, भाजपचे पक्षनेता तुषार भारतीय, माजी मंत्री अनिल बोंडे, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी उपस्थित होते.
-----------------
भाजप- युवा स्वाभिमान एकत्र नाही
भाजप आणि युवा स्वाभिमान एकत्र निवडणूक लढणार नाही, ही बाब चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली. आमदार रवि राणा हे भाजपचे सहयाेगी सदस्य आहे. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद अथवा नगर परिषद निवडणुका भाजप आणि युवा स्वाभिमान एकत्र लढणार, ही केवळ चर्चा असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.